‘एमपीएससी’ ने जाहीर केली नवीन गुणपद्धती; निगेटिव्ह मार्किंगबद्दल मोठा निर्णय

0
MPSCbook

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत वस्तुनिष्ठ बहुपर्यायी परीक्षांकरीता नकारात्मक गुणांच्या अंमलबजावणीसाठी (निगेटिव्ह मार्किंग) सुधारित कार्यपद्धत जाहीर करण्यात आली आहे. यातील दोन महत्वाचे बदल म्हणजे, आता इथून पुढे परीक्षांचा निकाल अपूर्णांकात लागणार आहे व प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी आता १/४ एवढे गुण एकूण गुणांमधून वजा करण्यात येणार आहेत.

आयोगाकडून यासंदर्भात जाहीर करण्यात आलेल्या परिपत्रकात म्हटले आहे की, महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत आयोजित विविध वस्तुनिष्ठ बहुपर्यायी परीक्षांकरीता चार चुकीच्या उत्तरांबद्दल एक गुण वजा करण्याबाबतची नकारात्मक गुणांची पद्धत (निगेटिव्ह मार्किंग) २००९ मध्ये प्रथम लागू करण्यात आली. त्यानंतर राज्य सेवा परीक्षेच्या संदर्भात नकारात्मक गुण वजा करण्याची कार्यपद्धती काही बदलासह अबलंबिवण्यात आली. या कार्य पद्धतीचा आढावा घेण्यात आला. वस्तुनिष्ठ बहुपर्यायती परीक्षांकरीता यापूर्वी अवलंबविण्यात येत असलेल्या सर्व कार्यपद्धती अधिक्रमित करून यापुढे सर्व वस्तुनिष्ठ बहुपर्यायी परीक्षांकरता पुढीलप्रमाणे कार्यपद्धती विहित करण्यात येत आहे.

  • प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी २५ टक्के किंवा १/४ एवढे गुण एकूण गुणांमधून वजा करण्यात येतील.
  • एखाद्या प्रश्नाची एकापेक्षा अधिक उत्तरे दिली असल्यास अशा प्रश्नाचे उत्तर चुकीचे समजण्यात येऊन त्या प्रश्नाच्या उत्तरासाठी २५ टक्के किंवा १/४ एवढे गुण एकूण गुणांमधून कमी करण्यात येतील.
  • वरीलप्रमाणे कार्यपद्धतीचा अवलंब करताना एकूण अंतिम गुणांची बेरीज अपूर्णांकात आली तरीही ती अपूर्णांकातच राहील व पुढील कार्यवाही त्याच्या आधारे करण्यात येईल.
  • एखाद्या प्रश्नाचे उत्तर अनुत्तरित असेल तर, अशा प्रकरणी नकारात्मक गुणांची पद्धत लागू असणार नाही.

ही कार्यपद्धत आयोगामार्फत आयोजित सर्व स्पर्धा परीक्षा, मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा तसेच चाळणी परीक्षांसाठी लागू राहणार आहे. या कार्यपद्धत यापुढे जाहीर होणाऱ्या सर्व लेखी परीक्षांच्या निकालाकरता लागू राहणार आहे. आयोगाच्या संकेतस्थळावरील संबंधित परीक्षांच्या योजनांमध्ये यथावकाश सुधारणा करण्यात येतील. तोपर्यंत या कार्यपद्धतीनुसार कार्यवाही करण्यात येईल, असे कळवण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here