ओझोन वायू बद्दल संपूर्ण माहिती (Ozone Layer in Marathi)

Ozone Layer in Marathi

ओझोन हा वातावरणामध्ये नैसर्गिकरीत्या आढळणारा एक वायू आहे. ओझोनच्या एका रेणूमध्ये ऑक्सिजनचे तीन अणू असल्यामुळे ओझोनचे रासायनिक सूत्र O3 असे ओळखले जाते. क्रिस्टियन फ़्रेडरिक स्कोएनबेन ह्या जर्मन-स्विस रसायनशास्त्रज्ञाने 1840 साली ओझोनचा शोध लावला.

ओझोन हा वातावरणाच्या मुख्यत: दोन थरांमध्ये आढळतो, ते म्हणजे जमिनीपासून 10 ते 16 किलोमीटर पर्यंतचा वातावरणाचा थर म्हणजे तपांबर (troposphere) आणि तपांबराच्या वर 50 किलोमीटर पर्यंतचा थर म्हणजे स्थितांबर (stratosphere). एकूण प्रमाणाच्या 10 टक्के ओझोन तपांबरात तर 90 टक्के ओझोन स्थितांबरामध्ये आढळतो. स्थितांबरमधला ओझोनचा थर हा ‘ओझोन थर’ म्हणून ओळखला जातो. ओझोनचे प्रमाण विषुववृत्तीय प्रदेशावर कमी तर ध्रुवीय प्रदेशांवर सर्वाधिक असते.

तपांबरातील ओझोन हा प्रदूषक आहे. तपांबरामध्ये ओझोनचे प्रमाण वाढल्यास ते जंगलांच्या वाढीस मारक तसेच विविध श्वसनविकारांना आमंत्रण देणारे ठरू शकते. ओझोन हा हरितगृह वायू असल्यामुळे तो तपांबराचे व पृथ्वीच्या पृष्ठभागाचे तापमान वाढविण्यासही कारणीभूत होऊ शकतो.

स्थितांबरातला ओझोन हा नैसर्गिकरीत्या दोन टप्प्यांमध्ये तयार होतो. पहिल्या टप्प्यांत सौरप्रारणांमुळे ऑक्सिजनच्या रेणूंचे (O2) विघटन होऊन ऑक्सिजनचे अणू (O+O) वेगळे होतात. दुसर्‍या टप्प्यामध्ये विघटित ऑक्सिजन अणूंचा (O) ऑक्सिजनच्या रेणूंशी (O2) संयोग होऊन ओझोनचे रेणू (O3) तयार होतात. नैसर्गिकरीत्या निर्माण झालेल्या ओझोनचा सौरप्रारणांमुळे व मानवनिर्मित रसायनांशी संयोग पावल्याने नाश होतो. सूर्यकिरणांतल्या अतिनील (UV) प्रारणांमुळे ओझोनच्या रेणूंचे विघटन होते आणि अशाप्रकारे ओझोनचा थर अतिनील किरणांना पृथ्वीच्या पृष्ठभागावर येण्यापासून थोपवतो. अतिनील किरणे जमिनीपर्यंत पोहोचल्यास ती आपल्यासाठी हानीकारक असतात.

मानवनिर्मित रसायनांमुळे अंटार्क्टिक स्थितांबरात ओझोनचे प्रमाण खूप कमी होण्याला ओझोन छिद्र असे म्हणतात. ह्या ओझोन छिद्राची पहिली नोंद 1985 साली जे. सी. फार्मन, बी. जी. गार्डिनर आणि जे. डी. शांकलिन ह्यांनी एका शोधनिबंधामध्ये केली. वातानुकूलन प्रक्रियेत निर्माण होणाऱ्या क्लोरोफ्लोरोकार्बन्स (CFC) वायूमुळे ओझोन थराचे नुकसान होते.

1990च्या दशकात जवळपास ओझोनच्या थरात 10 टक्के घट झाल्याचे दिसून आले होते. ओझोन थराच्या संरक्षणासाठी 16 सप्टेंबर 1987 रोजी संयुक्त राष्ट्रसंघाच्या नेतृत्वात ओझोन थराच्या संरक्षणासाठी कॅनडाच्या मॉन्ट्रिएल शहरात जगभरातल्या प्रतिनिधींनी एका आंतरराष्ट्रीय करारावर सह्या केल्या. हा करार ओझोनच्या थरास हानीकारक ठरणार्‍या पदार्थांचा वापर कमी करण्यासाठी उपाययोजना करण्याचा होता. या देशांनी क्लोरोफ्लोरोकार्बन्सच्या वापरावर निर्बंध घालण्याचे मान्य केले. 2000 सालापासून दर दशकात 3 टक्के इतकी ओझोनमध्ये सुधारणा झाली आहे.

1 thought on “ओझोन वायू बद्दल संपूर्ण माहिती (Ozone Layer in Marathi)”

Leave a Comment