स्वच्छ सर्वेक्षण 2020

‘स्वच्छ भारत मिशन-शहरी’ या मोहिमेच्या अंतर्गत ‘स्वच्छ सर्वेक्षण 2020’ या केंद्रीय गृहनिर्माण व शहरी कल्याण मंत्रालयाने केलेल्या शहरी स्वच्छताविषयक पाचव्या वार्षिक सर्वेक्षण उपक्रमाच्या विजेत्यांना ‘स्वच्छ महोत्सव’ नावाच्या आभासी कार्यक्रमात पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

‘स्वच्छ सर्वेक्षण 2020’ मध्ये 4242 शहरांचे, 62 कटक मंडळांचे आणि 97 गंगाकाठी शहरांचे सर्वेक्षण केले गेले आणि यामध्ये 1.87 कोटी नागरिकांचा अभूतपूर्व सहभाग होता. हे सर्वेक्षण अतिशय व्यापक स्तरावर राबवण्यात आले. सर्वेक्षणाच्या पथकांनी 58,000 निवासी आणि 20,000 पेक्षा जास्त व्यावसायिक भागांना भेटी दिल्या.

इंदूर (मध्यप्रदेश) शहराने भारतातले सर्वात जास्त स्वच्छ शहर (दहा लक्षाहून जास्त लोकसंख्येच्या श्रेणीत) हा प्रतिष्ठेचा पुरस्कार पटकावला आहे. मंत्रालयाच्यावतीने एकूण 129 पुरस्कारांचे वाटप करण्यात आले आहे.

विविध श्रेणीत सर्वाधिक स्वच्छ ठरलेली शहरे/राज्ये :

 • 10 लक्षाहून जास्त लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये (प्रथम दहा): इंदूर, सूरत, नवी मुंबई, विजयवाडा, अहमदाबाद, राजकोट, भोपाळ, चंदीगड, जीव्हीएमसी विशाखापट्टनम, वडोदरा
 • 1-10 लक्ष लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये (प्रथम पाच): अंबिकापूर, म्हैसूर, नवी दिल्ली, चंद्रपूर (एमएस), खारगोन
 • 100 हून अधिक शहर संख्या असलेल्या राज्यांमध्ये (प्रथम तीन): छत्तीसगड, महाराष्ट्र, मध्यप्रदेश
 • 100 हून कमी शहर संख्या असलेल्या राज्यांमध्ये (प्रथम तीन): झारखंड, हरयाणा, उत्तराखंड
 • गंगा नदी काठचे सर्वात स्वच्छ शहर – वाराणसी
 • भारतातली सर्वात स्वच्छ राजधानी – नवी दिल्ली
 • भारतातली सर्वात स्वच्छ छावणी – जालंधर छावणी मंडळ
 • भारतातले 40 लक्ष लोकसंख्या असलेले सर्वात स्वच्छ शहर – अहमदाबाद, गुजरात

इतर बाबी :

 • इंदूर, अंबिकापूर, नवी मुंबई, सूरत, राजकोट आणि मैसुरू शहरांना पंचतारांकित मानांकन, तर 86 शहरांना त्रितारांकित आणि 64 शहरांना एकतारांकित मानांकन देण्यात आले आहे.
 • आतापर्यंत 4,324 शहरी स्थानिक संस्था हागणदारीमुक्त घोषित करण्यात आल्या.
 • देशात 1,319 शहरे हागणदारीमुक्त+ प्रमाणित आणि 489 शहरे हागणदारीमुक्त++ प्रमाणित आहेत.
 • 66 लक्षाहून जास्त घरगुती शौचालयांची आणि 6 लक्षाहून जास्त सामुदायिक/सार्वजनिक शौचालयांची निर्मिती करण्यात आली आहे.
 • 2,900 हून अधिक शहरांमधल्या 59,000 पेक्षा जास्त शौचालयांची माहिती गुगल मॅप या अॅप्लिकेशनवर वास्तविक वेळेत उपलब्ध करून देण्यात आली आहे.
 • घनकचरा व्यवस्थापनाच्या क्षेत्रात 96 टक्के प्रभागांमध्ये घरोघरी कचरा गोळा करण्याची सोय आहे तर जमा होणाऱ्या एकूण कचऱ्यापैकी 66 टक्के कचऱ्यावर प्रक्रिया केली जाते. 2014 सालाच्या 18 टक्क्यांच्या तुलनेत ही सुमारे चौपट वाढ आहे.

2014 साली 100 टक्के घनकचरा व्यवस्थापनासह शहरी भारत 100 टक्के हागणदारीमुक्त (ODF) करण्याचे उद्दिष्ट ठरवून ‘स्वच्छ भारत मिशन-शहरी’ ही मोहीम सुरू करण्यात आली. त्यावेळी शहरी भागात घनकचरा व्यवस्थापनाचे प्रमाण केवळ 18 टक्के होते.

स्वच्छ सर्वेक्षण 2021च्या सोबतच आता प्रेरक दौर सम्मान ही कामगिरी निर्धारित करणारी नवी श्रेणी सादर करण्यात आली आहे. यामध्ये दिव्य (प्लॅटिनम), अनुपम (गोल्ड), उज्ज्वल (रौप्य), उदित (ब्रॉन्झ), आरोही (आकांक्षी) या उपश्रेणींचा समावेश आहे.

सध्याच्या शहरांच्या लोकसंख्येच्या आधारावर मूल्यांकन करण्याच्या निकषांव्यतिरिक्त ही नवी श्रेणी या शहरांचे या सहा निवड श्रेणींच्या आधारे वर्गीकरण करणार.

Leave a Comment