एमपीएससी : स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून ‘अम्फान चक्रीवादळ’

0

या लेखामध्ये या चक्रीवादळाशी संबंधित महत्त्वाच्या मुद्दय़ांची चर्चा करण्यात येत आहे.

भारताची पूर्व किनारपट्टी आणि बांगलादेश या क्षेत्रामध्ये मे २०२० मध्ये आलेले अम्फान चक्रीवादळ हे अत्यंत तीव्र आणि विध्वंसक चक्रीवादळ होते. स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून या वादळाशी संबंधित कोणत्या बाबी महत्त्वाच्या आहेत, कोणत्या मुद्दय़ांचा अभ्यास करायला हवा हे समजणे आवश्यक आहे. अन्यथा बिनमहत्त्वाची आकडेवारी, विवाद आणि राजकीय चर्चा अभ्यासण्यात वेळ वाया जाऊ शकतो. या लेखामध्ये या चक्रीवादळाशी संबंधित महत्त्वाच्या मुद्दय़ांची चर्चा करण्यात येत आहे.

अम्फान चक्रीवादळ तथ्ये

कालावधी : १६ मे ते २० मे २०२०

हवामानविषयक मुद्दे :

  • सर्वाधिक वेग २६०किमी प्रति तास; सर्वात कमी दाब  –  925 hPa (mbar); 27.32 inHg
  • सुपर सायक्लोन किंवा पाचव्या श्रेणीचे चक्रीवादळ

प्रभावक्षेत्र :

  • श्रीलंका, भारत (अंदमान निकोबार द्वीपसमूह, ओदीशा व पश्चिम बंगाल), बांगलादेश, भूतान
  • प्रत्यक्ष चक्रीवादळाच्या मार्गामध्ये केरळ, तमिळनाडू आणि आंध्र प्रदेश ही राज्ये नसली तरी त्यांच्यावरही या वादळाचा दुय्यम परिणाम झाला आहे.

आर्थिक मुद्दे :

  • जीवितहानी – १२०; वित्तहानी – १३३९ कोटी डॉलर

आनुषंगिक तथ्ये :

उत्तर हिंदी महासागर क्षेत्रातील आत्तापर्यंतचे सर्वात विध्वंसक व नुकसानकारक चक्रीवादळ, सन १९९९च्या ओदिशा चक्रीवादळानंतरचे पहिलेच Super cyclonic storm म्हणजे पाचव्या किंवा सर्वाधिक श्रेणीचे चक्रीवादळ

मूलभूत संज्ञा आणि संकल्पना : उष्णकटिबंधीय चक्रीवादळ ही एक अशी वादळ प्रणाली आहे ज्यामध्ये एक मोठे कमी-दाब केंद्र, एक बंद निम्नस्तरीय अभिसरण प्रणाली आणि जोरदार वारा आणि मुसळधार पाऊस निर्माण करणाऱ्या असंख्य वादळांची आवर्त व्यवस्था असते. उष्णकटिबंधीय चक्रीवादळ यामध्ये दोन संज्ञा समाविष्ट आहेत.

उष्णकटिबंधीय : यातून वादळांचे भौगोलिक क्षेत्र लक्षात येते. कर्कवृत्त आणि मकरवृत्ताच्या दरम्यानचे क्षेत्र उष्णकटिबंधीय क्षेत्र असले तरी बहुतेक उष्णकटिबंधीय चक्रीवादळे विषुववृत्ताच्या दोन्ही बाजूंना १० अंश अक्षांशादरम्यान उगम पावतात.

चक्रीवादळ : याचा शब्दश: अर्थ आहे चक्रीय दिशेने फिरणारे वारे. हे वारे आपल्या केंद्राभोवती उत्तर गोलार्धामध्ये घडय़ाळाच्या काटय़ांच्या उलटय़ा दिशेने तर दक्षिण गोलार्धात घडय़ाळाच्या काटय़ांच्या दिशेने फिरतात. कोरिआलिस परिणामामुळे दोन्ही गोलार्धामधील वाऱ्यांची दिशा वेगळी असते.

निर्मिती : ही वादळे तुलनेने उष्ण समुद्री प्रवाह क्षेत्रांमध्ये निर्माण होतात. महासागराच्या पाण्याच्या बाष्पीभवनातून या वाऱ्यांना ऊर्जा मिळते. पाण्याचे उच्च तापमान, उंचीबरोबर वेगाने घटणारे तापमान, उच्च आद्र्रता, वाऱ्यांच्या गतीमध्ये बदल होण्याचे कमी प्रमाण या चक्रीवादळांच्या निर्मितीसाठी आवश्यक भौगोलिक बाबी आहेत.

तीव्रता आणि तिच्या श्रेणी : चक्रीवादळांच्या श्रेणी किंवा वर्गीकरण त्या त्या क्षेत्रातील हवामान विभागांकडून करण्यात येते. उत्तर हिंदी महासागरातील १०० अंश पूर्व ते ४५ अंश पूर्व या क्षेत्रातील चक्रीवादळांचे श्रेणीकरण किंवा वर्गीकरण भारतीय हवामानशास्त्र विभागाकडून करण्यात येते. त्यासाठीचे निकष पुढीलप्रमाणे आहेत.

चक्रीवादळांचे नामकरण :

उष्णकटिबंधीय चक्रीवादळे ही साधारणपणे एक आठवडय़ापर्यंत किंवा काही वेळ त्यापेक्षा जास्त दिवस प्रभावी असू शकतात. त्यामुळे एखाद्या क्षेत्रात एकाच वेळी एकापेक्षा जास्त चक्रीवादळे कार्यरत असू शकतात. अशा वेळी या वादळांची माहिती, पूर्वसूचना, इशारे प्रसारित करणे व आपत्ती व्यवस्थापन करताना कुठलाही गोंधळ उडू नये म्हणून त्यांना सामान्य भाषेतील नावे देण्यात येतात. पारिभाषिक क्लिष्ट संज्ञांपेक्षा ही नावे धोक्याचे इशारे आणि माहितीचे प्रसारण करताना जास्त उपयुक्त आणि प्रभावी ठरतात.

ही नावे कोणत्याही प्रसिद्ध व्यक्तींची स्मृती म्हणून किंवा तशा हेतूने दिली जात नाहीत. त्या त्या क्षेत्रातील स्थानिक लोकांना परिचित अशी ही नावे असतात जेणेकरून स्थानिक लोकांमध्ये या वादळांची माहिती, पूर्वसूचना, इशारे प्रसारित करणे आणि त्यांना ते चटकन व व्यवस्थितपणे कळणे शक्य व्हावे.

हिंद महासागरातील चक्रीवादळांची नावे ठरविण्यासाठी जागतिक हवामान परिषदेची क्षेत्रीय समिती (WMO /ESCAP panel) कार्यरत आहे. यामध्ये एकूण १३ देशांचा समावेश आहे (भारत, बांगलादेश, इराण, मालदीव, म्यानमार, ओमान, पाकिस्तान, कतार, सौदी अरब, श्रीलंका, थायलंड, संयुक्त अरब अमिराती आणि येमेन). अम्फान हे नाव थायलंडने दिलेल्या सूचीतून देण्यात आले आहे. यानंतर चक्रीवादळे आली तर निसर्ग (बांगलादेशाकडून सुचविलेले), गती (भारताकडून सुचविलेले), निवर (इराणकडून सुचविलेले), बुरेवी (मालदीवकडून सुचविलेले) आणि तौते (म्यानमारकडून सुचविलेले) अशी नावे देण्यात येतील. एकूण १३ देशांकडून देण्यात आलेली प्रत्येकी १३ नावांची सूची वापरण्यात येईल.

Credit : रोहिणी शहा

वरील सर्व माहिती/लेख दै. लोकसत्ता मधून घेतला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here