चालू घडामोडी | 09 नोव्हेंबर 2020

अटल इनोव्हेशन मिशन आणि सिरिअस (रशिया) यांचा “AIM-सिरिअस नवोन्मेष कार्यक्रम 3.0” :

अटल इनोवेशन मिशन (AIM) आणि रशियाच्या सिरिअस या विज्ञान प्रशिक्षण केंद्राने 7 नोव्हेंबर 2020 रोजी दोन्ही देशांच्या शालेय विद्यार्थ्यांसाठी “AIM-सिरिअस नवोन्मेष कार्यक्रम 3.0” नामक एका कार्यक्रमाचा शुभारंभ केला. हा 14 दिवस चालणारा एक आभासी कार्यक्रम आहे.

ठळक बाबी

  • 7 ते 21 नोव्हेंबर 2020 या दोन आठवड्यांच्या कालावधीत चालणाऱ्या या कार्यक्रमामध्ये 48 विद्यार्थी आणि 16 शिक्षक आणि मार्गदर्शकांचा समावेश आहे.
  • विद्यार्थ्यांनी संकेतस्थळ आणि मोबाईल आधारित अशा दोन्ही प्रकाराच्या तंत्रज्ञानाचा आणि उपायांचा विकास करावा हा या पहिल्या भारत-रशिया युवा नवोन्मेष उपक्रमाचा उद्देश आहे.
  • कोविड-19 महामारीच्या पार्श्वभूमीवर, संस्कृती, दूरशिक्षण, उपयोजित आकलन विज्ञान, आरोग्य व कल्याण, क्रिडा, तंदुरुस्ती आणि क्रिडा प्रशिक्षण, रसायनशास्त्र, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि डिजिटल आर्थिक मालमत्ता अशा विविध क्षेत्रांमधल्या जागतिक आव्हानांवर उपाययोजना ठरू शकणार, अशा प्रकाराची 8 आभासी उत्पादने आणि मोबाईल अॅप्लिकेशन तयार केले जाणार आहेत.

शक्तिकांत दास यांनी SAARC देशांच्या केंद्रीय बँकांच्या गव्हर्नरांच्या 40 व्या बैठकीचे अध्यक्षपद भूषविले :

4 नोव्हेंबर 2020 रोजी आयोजित करण्यात आलेल्या SAARC देशांच्या केंद्रीय बँकांच्या गव्हर्नरांची 40 वी बैठक भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या गटाला ‘सार्कफायनान्स गव्हर्नर्स ग्रुप’ म्हणून ओळखले जाते.

कार्यक्रमाच्या प्रसंगी दास यांनी ‘सार्कफायनान्स सिंक’ नामक क्लोज्ड यूजर ग्रुप आधारित सुरक्षित संप्रेषण नेटवर्कचे उद्घाटन केले. क्षेत्रातल्या सदस्य देशांच्या दरम्यान जाहीर केलेल्या बृहत्‌-आर्थिक धोरणांबाबतचे अनुभव सामायिक करण्यासाठी ‘सार्कफायनान्स सिंक’ नेटवर्कची स्थापना करण्यात आली.

इंकेटल चॅलेंजर टेनिस स्पर्धा : रामकुमारला उपविजेतेपद

भारताचा आघाडीचा टेनिसपटू रामकुमार रामनाथनला वाढदिवसाच्या दिवशी म्हणजे रविवारी इकेंटल चॅलेंजर टेनिस स्पर्धेत उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.

बिगरमानांकित रामकुमारला २६व्या वाढदिवसाच्या दिवशी अमेरिकेच्या सातव्या मानांकित सेबॅस्टियन कोर्डाकडून ४-६, ४-६ असा पराभव स्वीकारावा लागला. रामकुमारचा पराभव झाला असला तरी या वर्षांतील त्याची ही सर्वोत्तम कामगिरी ठरली.

या उपविजेतेपदासोबतच त्याने जागतिक क्रमवारीत पहिल्या २०० मध्ये स्थान मिळवले आहे. त्याच्या क्रमवारीत ६० गुणांची भर पडली असून त्याला १८५वे स्थान मिळाले आहे. पहिल्या सेटपासून रामकुमारने चुरस द्यायचा प्रयत्न केला होता.

दुसऱ्या सेटमध्ये तर ४-४ अशी बरोबरी होती. त्यामध्येच रामकुमारला पुढच्या गेममध्ये ४०-० अशी आघाडी मिळाल्याने ५-४ असा गुणफलक करण्याची संधी होती. मात्र तिथे सलग पाच गुण गमावत रामकुमारने सामन्यावरील नियंत्रण पूर्णपणे घालवले होते.

Leave a Comment