चालू घडामोडी | 09 जुलै 2020

हवामान बदलविषयक कृतीबाबत पर्यावरण मंत्र्यांची चौथी जागतिक आभासी परिषद संपन्न :

दिनांक 7 जुलै 2020 रोजी हवामान बदलविषयक कृतीबाबत पर्यावरण मंत्र्यांची चौथी जागतिक आभासी परिषद संपन्न झाली.

या आभासी बैठकीचे अध्यक्षपद, युरोपीय महासंघ, चीन आणि कॅनडा या तिघांनीही संयुक्तपणे भूषवले. या बैठकीत 30 देशांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते.

ठळक बाबी

  • हवामान बदलविषयक संयुक्त राष्ट्रसंघ आराखडा परिषद (UNFCCC)  अंतर्गत पॅरिस कराराची पूर्ण अंमलबजावणी करणे आणि जागतिक हवामान बदलविषयक कृतीविषयी राजकीय इच्छाशक्तीचे प्रदर्शन करणे हा या परिषदेचा मुख्य हेतू होता.
  • परिषदेत विविध देशांनी, आर्थिक हानी भरुन काढताना त्याची सांगड पॅरिस कराराशी घालून पर्यावरणाचे संरक्षण करावे आणि हवामान बदल विषयक कृती कायम सुरु राहावी यासाठी अनुकूल परिस्थिती कायम ठेवणे, यावर सर्वांनी आपापली मते मांडली.
  • केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी या परिषदेत भारताचे प्रतिनिधित्व केले. विकसित देशांनी UNFCCC आणि पॅरिस करारांच्या अंतर्गत करण्यात आलेल्या कटिबद्धतेचे पालन करावे आणि विकसनशील देशांना वित्तीय तसेच तंत्रज्ञानविषयक सहकार्य द्यावे, असे आवाहन जावडेकर यांनी यावेळी केले.

भारतीय जवानांना 89 अॅ्प्स काढून टाका असा आदेश:

भारतीय लष्कराने जवानांना मोबाइलमधून 89 अॅाप्स तात्काळ काढून टाकण्याचा आदेश दिला आहे. भारतीय लष्कराकडून यासंबंधी आदेश प्रसिद्ध करण्यात आला असून यामध्ये टिकटॉक, फेसबुक, इन्स्टाग्राम तसंच पबजीचाही समावेश आहे.

भारतीय लष्करातील अधिकारी आणि जवानांच्या फोनमधून राष्ट्रीय सुरक्षेसंबंधी संवेदनशील आणि गोपनीय माहिती चोरी होण्याची शक्यता असल्याने हा आदेश देण्यात आला आहे. 15 जुलैपर्यंत अॅचप्स काढून टाकावीत असे निर्देश भारतीय लष्कराने अधिकारी, जवानांना दिले आहेत.

‘एक राज्य, एक खेळ -केंद्रीय क्रीडामंत्री किरेन रिजिजू:

ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धामध्ये भारतीय खेळाडूंनी अधिकाधिक पदके मिळवावी, यासाठी प्रत्येक राज्याने एका खेळाची निवड करून त्याच्या विकासावर लक्ष केंद्रित करावे, अशी इच्छा केंद्रीय क्रीडामंत्री किरेन रिजिजू यांनी व्यक्त केली.

एका वेबिनारदरम्यान रिजिजू यांनी ‘एक राज्य, एक खेळ’ या संकल्पनेचा प्रस्ताव मांडला. ‘भारताच्या प्रत्येक राज्यातील क्रीडा मंत्र्यालयांना ‘एक राज्य, एक खेळ’ या मोहिमेचा प्रस्ताव पाठवण्यात आला असून लवकरच याविषयी अंतिम निर्णय घेण्यात येईल. मणिपूर हे राज्य बॉक्सिंग या खेळावर विशेष लक्ष देऊ शकते,’’ असे रिजिजू म्हणाले.

गंगा पुनरुज्जीविकरण प्रकल्पासाठी जागतिक बँकेकडून 400 दशलक्ष डॉलरची मदत :

गंगा नदी पुनरुज्जीविकरण प्रकल्पामध्ये चाललेल्या ‘नमामी गंगे’ कार्यक्रमाला जागतिक बँकेकडून वाढीव अर्थिक मदत मिळणार असून त्याच्या संदर्भात जागतिक बँक आणि भारत सरकार यांच्यामध्ये 6 जुलै 2020 रोजी एका ऋण करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.

राष्ट्रीय गंगा नदी खोरे प्रकल्पाच्या द्वितीय टप्प्यासाठी ही मदत अतिशय महत्वपूर्ण ठरणार आहे. गंगा पुनरुज्जीविकरण प्रकल्पासाठी जागतिक बँकेनी देवू केलेल्या 400 दशलक्ष डॉलर इतक्या निधीमध्ये 381 दशलक्ष डॉलरचे कर्ज आणि 19 दशलक्ष डॉलरची प्रस्तावित हमी आहे.

जागतिक बँकेनी दिलेल्या 381 दशलक्ष डॉलरच्या कर्जाची मुदत 18.5 वर्षे आहे. 19 दशलक्ष डॉलरच्या हमी रकमेची मुदत, कर्जाच्या प्रभावी तारखेपासून 18 वर्षांनी संपणार आहे. जागतिक बँकेनी देऊ केलेल्या 400 दशलक्ष डॉलरमध्ये प्रस्तावित हमीचे 19 दशलक्ष डॉलरचा समावेश आहे.

या निधीतून सरकारला सार्वजनिक-खासगी भागिदारीचे हायब्रिड अॅन्यूटी मॉडेल (HAM-PPP) यामधून कार्य करण्यासाठी गुंतवणूक करण्यासाठी ज्या कंपन्या पुढे येतील त्यांना 40 टक्के निधी द्यावा लागणार आहे.

सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी अशाप्रकारे पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय पुनर्निर्माण व विकास बँक (IBRD) हमी देणार आहे. सध्याच्या आर्थिक परिस्थितीमध्ये सार्वजनिक गुंतवणुकीचे स्त्रोत मुक्त राहण्यासाठी आता त्यामुळे मदत होणार.

Leave a Comment