चालू घडामोडी | 06 नोव्हेंबर 2020

वन लायनर चालू घडामोडी

1) डॉ सुसंत कार (वैज्ञानिक, CSIR-CDRI, लखनऊ) यांना सोसायटी ऑफ बायोलॉजिकल केमिस्ट्स (इंडिया) संस्थेच्यावतीने ‘प्रो. ए. एन. भादुरी मेमोरियल लेक्चर पुरस्कार 2020’ देवून सन्मानित करण्यात आले.

2) राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळाचे (NDDB) वर्तमान अध्यक्ष दिलीप रथ हे आंतरराष्ट्रीय दुग्ध महासंघाच्या (IDF) संचालक मंडळावर निवडून आले आहेत.

3) उत्तराखंड राज्यातल्या डेहरादून महानगरपालिकेच्यावतीने ‘प्लास्टिक लाओ मास्क ले जाओ’ उपक्रम राबावला जात आहे. योजनेनुसार प्लास्टिक कचर्‍याच्या जागी मास्क / मुखपट्टी दिली जाणार आहे.

4) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली दि. 5 नोव्हेंबर 2020 रोजी जागतिक गुंतवणूकदारांची आभासी गोलमेज परिषद (VGIR) आयोजित केली गेली. कार्यक्रमाचे आयोजन भारत सरकारच्या अर्थ मंत्रालय आणि राष्ट्रीय गुंतवणूक व पायाभूत सुविधा निधी (NIIF) यांच्यावतीने करण्यात आले.

5) केंद्रीय मंत्रीमंडळाच्या आर्थिक बाबींसंदर्भातील समितीने हिमाचल प्रदेशातल्या शिमला आणि कुलू जिल्ह्यात सतलज नदीवरील लुहरी जलविद्युत प्रकल्पाच्या 210 मेगावॅट क्षमतेच्या पहिल्या टप्प्याचे बांधकाम करण्यासाठी निधीसह मंजूरी दिली आहे. या प्रकल्पामुळे वार्षिक 75 कोटी युनिट वीज निर्मिती होणार. सतलज जल विद्युत निगम लिमिटेड (SJVNL) कडून प्रकल्पाची अंमलबजावणी केली जाणार आहे.

6) अलास्ने औटारा यांची आयव्हरी कोस्ट देशाचे राष्ट्रपती म्हणून निवड झाली आहे. ते 2010 सालापासून राष्ट्रपती पदावर असून हा त्यांचा तिसरा कार्यकाळ असणार आहे.

7) भारतीय रेल्वेनी कृत्रिम बुद्धिमत्ता आणि डेटा अॅनालिटिक्स तंत्राच्या सहाय्याने कार्यप्रणाली सुधारण्यासाठी हैदराबादच्या इंडियन स्कूल ऑफ बिझिनेस या संस्थेसोबत भागीदारी करार केला आहे.

झारखंडनेही आता सीबीआयला रोखलं :

झारखंड राज्यानेही आता सीबीआयला राज्यात चौकशीसाठी निर्बंध आणले आहेत. सीबीआयला चौकशीसाठीची सामान्य संमती झारखंड सरकारकडून रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे यापुढे झारखंडमधील एखाद्या प्रकरणाची जर सीबीआयला चौकशी करायची असेल तर त्यासाठी राज्य सरकारची त्यांना परवानगी घ्यावी लागणार आहे.

पश्चिम बंगाल, राजस्थान, महाराष्ट्र, केरळ नंतर आता झारखंडनेही सीबीआयला राज्यात चौकशीसाठीची सामान्य संमती रद्द केली आहे. सीबीआयला रोखणारं झारखंड हे पाचवं बिगरभाजपा सरकार असलेलं राज्य ठरलं आहे.

लष्करप्रमुख नरवणेंनी स्वीकारली नेपाळची मानद जनरल रँक :

नेपाळ दौऱ्यावर असलेले लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे यांना नेपाळ सरकारने मानद जनरल रँक देऊन सन्मानित केले. नेपाळच्या राष्ट्रपती विद्यादेवी भंडारी यांनी गुरुवारी नरवणे यांचा सन्मान केला.

उभय देशांच्या लष्करप्रमुखाचा सन्मान करण्याची परंपरा सन १९५० पासून भारत आणि नेपाळ या दोन्ही देशांनी जपली आहे. गेल्या वर्षीच्या जानेवारी महिन्यात नेपाळचे लष्करप्रमुख जनरल थापा यांचा राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी मानद जनरल रँक प्रदान करून सन्मान केला होता.

13 वी ‘अर्बन मोबिलिटी इंडिया’ परिषद :

गृहनिर्माण व शहरी कामकाज मंत्रालयाच्यावतीने 9 नोव्हेंबर 2020 रोजी 13 व्या ‘अर्बन मोबिलिटी इंडिया’ (UMI) परिषदेचे आयोजन केले जाणार आहे. एक दिवस चालणारी ही परिषद आभासी पद्धतीने भरणार आहे.

ठळक बाबी

  • या वर्षीचा कार्यक्रम “शहरी गतिशीलतेतला उदयोन्मुख कल” या मुख्य संकल्पनेवर आधारित असून लोकांना सुलभ आणि सोयीस्कर वाहतूक सुविधा पुरवण्यासंदर्भात कोविड-19 महामारीमुळे उद्भवलेल्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर केलेल्या नाविन्यपूर्ण उपायांवर भर दिला जाणार.
  • गृहनिर्माण व शहरी कामकाज मंत्री हरदीप एस. पुरी यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन होणार आहे.

1 thought on “चालू घडामोडी | 06 नोव्हेंबर 2020”

Leave a Comment