चालू घडामोडी | 31 ऑगस्ट 2020

भारताने सुवर्ण पदक जिंकत इतिहास रचला- ऑनलाइन बुद्धिबळ ऑलिंपियाड :

फिडे जागतिक ऑनलाइन बुद्धिबळ ऑलिंपियाड स्पर्धेत भारतानं रविवारी पहिल्यांदाच सुवर्ण पदक जिंकत इतिहास रचला. या स्पर्धेदरम्यान इंटरनेट आणि सर्व्हरमध्ये बिघाड झाल्याने या ऑनलाइन स्पर्धेत भारत आणि रशियाला संयुक्त विजेता घोषित करण्यात आले.

सुरुवातीला रशियाला विजेता घोषित करण्यात आलं कारण फायनलमध्ये भारताचे दोन खेळाडू निहाल सरीन आणि दिव्या देशमुख यांनी सर्व्हरसोबत कनेक्शन होत नसल्याने वेळ गमावला.

भारताने या वादग्रस्त निर्णयाला विरोध दर्शवला त्यानंतर याची समिक्षा करण्यात आली आणि भारत-रशिया या दोन्ही देशांना संयुक्त विजेता घोषित करण्यात आलं.

ASEAN-भारत देशांच्या अर्थ मंत्र्यांची 17 वी बैठक संपन्न :

ASEAN समूह आणि भारत या देशांच्या अर्थ मंत्र्यांची 17 वी सल्ला-मसलत बैठक आभासी पद्धतीने 29 ऑगस्ट 2020 रोजी घेण्यात आली. बैठकीला भारताच्यावतीने केंद्रीय वाणिज्य व उद्योग तसेच रेल्वे मंत्री पीयूष गोयल उपस्थित होते.

पीयूष गोयल आणि व्हिएतनामचे उद्योग मंत्री त्रान तुआन अन्ह यांनी बैठकीचे अध्यक्षपद संयुक्तपणे भूषवले. आग्नेय आशियाई राष्ट्र संघ (Association of Southeast Asian Nations -ASEAN) ही आग्नेय आशियामधली एक राजकीय व आर्थिक संघटना आहे.

त्याची स्थापना इंडोनेशिया, मलेशिया, फिलिपाईन्स, सिंगापूर व थायलँड या देशांनी 8 ऑगस्ट 1967 रोजी केली. जकार्ता (इंडोनेशिया) शहरात त्याचे मुख्यालय आहे. आज समूहात ब्रुनेई, कंबोडिया, इंडोनेशिया, लाओस, मलेशिया, म्यानमार, फिलिपिन्स, सिंगापूर, थायलँड आणि व्हिएतनाम या 10 देशांचा समावेश आहे.

भारतीय नौदलासाठी 6 पारंपरिक पाणबुडय़ा बांधण्याच्या 55 हजार कोटींची निविदा :

भारतीय नौदलासाठी 6 पारंपरिक पाणबुडय़ा बांधण्याच्या 55 हजार कोटी रुपयांच्या महाप्रकल्पासाठी पुढील महिन्यापर्यंत निविदा प्रक्रिया सुरू करण्याची तयारी पूर्ण झाली आहे.

अत्याधुनिक लष्करी साधनसामुग्री देशातच तयार करून त्यांच्या आयातीवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी विदेशातील बडय़ा संरक्षण साहित्य उत्पादक कंपन्यांसोबत भागीदारी करण्यास देशी कंपन्यांना परवानगी देणाऱ्या सामरिक भागीदारी प्रारूपांतर्गत या पाणबुडय़ांची निर्मिती केली जाणार आहे.

‘पी-75’ असे नाव ठेवण्यात आलेल्या या महाप्रकल्पाकरिता, या पाणबुडय़ांच्या तपशिलासारखी प्राथमिक कामे आणि प्रस्तावाबाबतची विनंती जारी करण्यासाठीची औपचारिकता संरक्षण मंत्रालय आणि भारतीय नौदल यांच्या वेगवेगळ्या चमूंनी पूर्ण केली आहे.

‘मेक इन इंडिया’ उपक्रमांपैकी एक असलेल्या या प्रकल्पासाठी संरक्षण मंत्रालयाने एल अँड टी समूह व माझगाव डॉक्स लि. या 2 भारतीय शिपयार्ड व 5 विदेशी संरक्षण साहित्य कंपन्या यांची नावे विचारात घेतली आहेत.

Leave a Comment