चालू घडामोडी | 30 सप्टेंबर 2020

वन लायनर चालू घडामोडी

1) 28 सप्टेंबर 2020 रोजी मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने (एसीसी) वरिष्ठ भारतीय प्रशासकीय सेवा (आयएएस) अधिकारी पी. डी. वाघेला यांची भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (ट्राय) चे नवे अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली.

2) केंद्रीय जल मंत्रालयाच्या अंतर्गत पेयजल व स्वच्छता विभागाने सुरू केलेल्या गरीब कल्याण रोजगार अभियान (GKRA) मध्ये उत्तर प्रदेश सरकारने 8 पुरस्कार प्राप्त केले आहेत.

3) राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी जम्मू-काश्मीरच्या अधिकृत भाषा विधेयक, 2020 ला मान्यता दिली. यामुळे काश्मिरी, डोगरी, हिंदी, इंग्रजी आणि उर्दू यांना केंद्र शासित प्रदेश जम्मू-काश्मीरची अधिकृत भाषा म्हणून मान्यता देण्यात येईल. यापूर्वी उर्दू आणि इंग्रजी ही जम्मू आणि काश्मीरची अधिकृत भाषा होती.

4) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 29 सप्टेंबर 2020 रोजी उत्तराखंडमधील नमामि गंगे कार्यक्रमांतर्गत 6 मेगा प्रकल्पांचे उद्घाटन केले.

5) जपान मेरीटाइम सेल्फ-डिफेन्स फोर्स (JMSDF) आणि इंडियन नेव्हीने CCF2 & FOCWFच्या नेतृत्वात 3 दिवस अत्यंत यशस्वी सरावाची कामगिरी पूर्ण केली.

6) महाराष्ट्र सरकारने ज्येष्ठ महिला पार्श्वगायिका उषा मंगेशकर यांना सन 2020-21 चा गण सम्राग्नी लता मंगेशकर पुरस्कार जाहीर केला आहे.

परदेशी कंपनीला आता गुंतवणुकीची सक्ती नाही :

संरक्षण साहित्य खरेदी करताना परदेशी कंपनीला भारतात गुंतवणुकीची सक्ती केंद्र सरकारने हटवली आहे. कॅगच्या अहवालानंतर हा महत्त्वाचा निर्णय सरकारने घेतला. या निर्णयावरून आता देशभर गदारोळ होण्याची शक्यता आहे. कारण राफेल खरेदी व्यवहारात संबंधित कंपनीने वेळीच तंत्रज्ञान हस्तांतरित न केल्याचा संदर्भ कॅगच्या अहवालात होता.

कॅगच्या अहवालानंतरच सरकारने नियमात बदल केला. संरक्षण व्यवहारात भारतातील गुंतवणुकीच्या सक्तीला आॅफसेट धोरण म्हटले जाते. थेट आर्थिक, तंत्रज्ञानाच्या माध्यमातून हस्तांतरणाचा करार सरकार व संरक्षण साहित्य विकणाऱ्या कंपन्यांमध्ये होत असे.

संरक्षण खरेदी प्रक्रिया-2020 :

28 सप्टेंबर 2020 रोजी संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या हस्ते “संरक्षण खरेदी प्रक्रिया (DAP) – 2020”चे अनावरण करण्यात आले. 1 ऑक्टोबर 2020 पासून DAP 2020 लागू होणार आहे. केंद्र सरकारच्या आत्मनिर्भर भारत अभियानाशी आणि मेक इन इंडिया अभियानाद्वारे भारतीय देशांतर्गत उद्योगांच्या सबळीकरणाशी DAP 2020 याची सांगड घालण्यात आली असून भारत जागतिक उत्पादन केंद्र ठरावा हा यामागचा उद्देश आहे.

भारतीय विक्रेत्यांसाठी श्रेणीमध्ये आरक्षण – खरेदी (भारतीय-IDDM), मेक I, मेक II, संरचना आणि विकास क्षेत्रातल्या उत्पादन संस्था, आयुध निर्माण मंडळ / संरक्षण सार्वजनिक उपक्रम आणि SP मॉडेल भारतीय विक्रेत्यांसाठीच राखीव ठेवण्यात येणार. त्यासाठी मालकी आणि नियंत्रण भारतीय निवासी नागरिकाकडे असणे आवश्यक आहे आणि थेट परकीय गुंतवणूक 49 टक्क्यांपेक्षा जास्त असता कामा नये या निकषांची पूर्तता करायची आहे.

भारत-डेन्मार्क यांच्यातली हरित धोरणात्मक भागीदारी :

डेन्मार्कच्या पंतप्रधान मेट्टे फ्रेडरिक्सन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 28 सप्टेंबर 2020 रोजी भारत आणि डेन्मार्क दरम्यान आभासी शिखर परिषदेचे सह-अध्यक्षपद भूषवले. पंतप्रधान मोदी आणि पंतप्रधान फ्रेडरिक्सन यांनी द्विपक्षीय संबंधांबाबत मैत्रीपूर्ण वातावरणात विचारांचे आदानप्रदान केले.

विश्वासू भागीदार राहण्याची सामायिक इच्छा लक्षात घेत दोन्ही पंतप्रधानांनी भारत-डेन्मार्क संबंध हरित धोरणात्मक भागीदारीत वृद्धिंगत करण्याबाबत सहमती दर्शवली. ही भागीदारी भारत आणि डेन्मार्क यांचे संयुक्त सहकार्य आयोग (6 फेब्रुवारी 2009 रोजी स्वाक्षरी झाली) स्थापन करण्याच्या विद्यमान करारावर आधारित असणार ज्यामध्ये राजकीय, आर्थिक आणि व्यावसायिक, विज्ञान व तंत्रज्ञान, पर्यावरण, ऊर्जा, शिक्षण आणि संस्कृती या क्षेत्रात सहकार्याची  कल्पना केली आहे.

हरित धोरणात्मक भागीदारी ही राजकीय सहकार्याला गती, आर्थिक संबंध आणि हरित विकासाचा विस्तार, रोजगार निर्माण करणे आणि जागतिक आव्हाने व संधी या मुद्द्यांवर सहकार्य बळकट करण्यासाठी परस्पर लाभदायक व्यवस्था आहे.

Leave a Comment