चालू घडामोडी | 03 जून 2020

0
Chalu Ghadamodi

Cyclone Nisarga Path Tracker:

भारताचा आक्षेप धुडकावून पाकव्याप्त काश्‍मिरात वीज प्रकल् :

पाकिस्तान सरकारने भारताचा आक्षेप धुडकावून पाकिस्तानव्याप्त काश्‍मिरात 1124 मेगावॅट क्षमतेचा वीज प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेतला आहे. कोहला जलविद्युत प्रकल्प नावाने हा प्रकल्प तेथे राबवला जाणार आहे. चीनच्या एका कंपनीच्या मदतीने तेथे हा प्रकल्प उभारला जाणार असून त्यासाठी एक त्रिपक्षीय करारही निश्‍चित करण्यात आला आहे.

झेलम नदीच्या किनारी हा प्रकल्प उभारला जाणार आहे. त्यातून पाच अब्ज युनिट वीज स्वस्तात उपलब्ध होऊ शकणार आहे. या प्रकल्पासाठी एकूण 2.4 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक केली जाणार आहे. पाकिस्तानव्याप्त काश्‍मिरात चीन आणि पाकिस्तान यांचा इकॉनॉमिक कॉरिडॉर उभा राहात आहे.

तीन हजार किमी लांबीचा हा कॉरिडॉर असून हा प्रकल्प त्याच कॉरिडॉरमधील गुंतवणुकीचा भाग आहे. चीनचा शिंजीयांग प्रांत आणि पाकिस्तानचे ग्वादर बंदर यांना जोडणाऱ्या या कॉरिडॉरमध्ये रेल्वेलाइन, रस्ते, पाइपलाइन आणि ऑप्टिकल फायबर केबललाइनही टाकण्याचे काम सुरू झाले आहे.

रशियाने बनवलं नवीन औषध :

रशियाने करोना व्हायरसवर प्रभावी ठरणारे एक औषध विकसित केले आहे. पुढच्या आठवडयापासून रशियामध्ये करोनाची लागण झालेल्या रुग्णांवर या औषधाचा वापर सुरु होणार आहे. रशियाच्या आरोग्य यंत्रणेने हे औषध वापरण्यास मंजुरी दिली आहे.

तर या नव्या औषधामुळे आरोग्य यंत्रणेवरील ताण कमी होईल तसेच विस्कटलेली आर्थिक घ़डी रुळावर येऊन सर्वसामान्य जीवन हळूहळू पूर्वपदावर येईल अशी अपेक्षा आहे. तसेच एविफेविर या नावाने औषधाची नोंदणी झाली आहे.

पुढच्या आठवडयापासून म्हणजे 11 जूनपासून रशियन रुग्णालयांमध्ये करोना रुग्णांवर या अँटीव्हायरल औषधाने उपचार सुरु होणार आहेत. एविफेविर औषध बनवणारी कंपनी महिन्याला 60 हजार रुग्णांवर उपचार करता येतील, इतक्या प्रमाणात औषध बनवणार आहे.

MSME उद्योगांना सक्षम करण्यासाठी ‘चॅम्पियन्स’ या तंत्रज्ञान व्यासपीठाचे उद्घाटन :

दिनांक 1 जून 2020 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ‘चॅम्पियन्स’ (CHAMPIONS) या तंत्रज्ञान व्यासपीठाचा शुभारंभ करण्यात आला. हे व्यासपीठ लहान औद्योगिक एकाकांच्या तक्रारींचे निराकरण करून त्यांना प्रोत्साहन, पाठिंबा आणि मदत देण्यासाठी तसेच त्यांच्या विकासासाठी तयार करण्यात आले आहे.

चॅम्पियन्स (CHAMPIONS) याचे पूर्ण नाव “उत्पादन आणि राष्ट्रीय सामर्थ्य वाढविण्यासाठी आधुनिक प्रक्रियेची निर्मिती आणि सामंजस्यपूर्ण अनुप्रयोग” (Creation and Harmonious Application of Modern Processes for Increasing the Output and National Strength) असे आहे.

एकाच जागी सर्व उपाययोजना उपलब्ध करून देण्याचा सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग मंत्रालयाचा हा एक उपक्रम आहे. कोविड-19 महामारीच्या कठीण परिस्थितीत MSME उद्योगांना मदत करण्यासाठी आणि राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय विजेते होण्यास मदत करण्यासाठी ही ICT आधारित प्रणाली तयार केली गेली आहे.

व्यासपीठाची उद्दीष्टे : वित्त, कच्चा माल, कामगार, नियामक परवानग्यांसह विशेषतः महामारीसारख्या कठीण परिस्थितीत निर्माण झालेल्या उद्योगांच्या अडचणी सोडविणे. वैद्यकीय उपकरणे, PPE कीट, मास्क इ. सारख्या वैद्यकीय वस्तूंचे उत्पादन आणि त्यांचा राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय बाजारात पुरवठा होण्यात उद्योगांना नवीन संधी मिळविण्यात मदत करणे.

अरबी समुद्रात तयार झालेल्या वादळाचं नाव कुणी दिलं?

अरबी समुद्रात तयार होणाऱ्या आगामी चक्रीवादळाचे नाव निसर्ग असे आहे. हे नाव बांगलादेशने सुचवले आहे. उत्तर हिंदी महासागरामध्ये निर्माण होणाऱ्या चक्रीवादळांच्या नावांची नवी यादी भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) गेल्या महिन्यात प्रसिद्ध केली होती.

नव्या यादीमध्ये अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरालगतच्या 13 देशांनी सुचवलेल्या प्रत्येकी 13 अशा एकूण 169 नावांचा समावेश करण्यात आला आहे. अरबी समुद्रातील आगामी चक्रीवादळापासून या नव्या यादीतील नावे चक्रीवादळांना देण्यात येणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here