चालू घडामोडी | 29 सप्टेंबर 2020

वन लायनर चालू घडामोडी

1) बीसीसीआयने (BCCI) नीतू डेव्हिडची (Neetu David) राष्ट्रीय महिला संघाच्या पाच सदस्यीय निवड समितीच्या अध्यक्षपदी निवड केली आहे.

2) ग्वालियर (मध्यप्रदेश) या शहरात नवे ‘सेंटर फॉर डिसअॅबिलिटी स्पोर्ट्स’ (दिव्यांगत्व क्रिडा केंद्र) उभारले जाणार आहे.

3) केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांच्या हस्ते आसाम परिसरातील नवीन भारतीय कृषी संशोधन संस्थेचे (IARI) उद्घाटन झाले.

4) कॅलिफोर्नियाची व्हर्जिन हायपरलूप कंपनी आणि बेंगळुरू आंतरराष्ट्रीय विमानतळ यांनी आधुनिक हायपरलूप तयार करण्याच्या दृष्टीकोनातून एकत्र अभ्यास करण्याची घोषणा केली.

5) पर्यटक आणि कर्मचाऱ्यांची सुरक्षितता आणि स्वच्छता यांची काळजी घेण्यासाठी आदरातिथ्य उद्योगाला मदत करण्याकरिता क्वालिटी कौन्सिल ऑफ इंडियासोबत केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाच्यावतीने “साथी” (System for Assessment, Awareness and Training for Hospitality Industry -SAATHI) उपक्रम तसेच “साथी” अॅपचे उद्घाटन करण्यात आले. देशभरात पर्यटकांच्या सोयीसाठी प्रशिक्षित व्यावसायिकांचे मनुष्यबळ उपलब्ध करण्याच्या उद्देशाने हा कार्यक्रम तयार करण्यात आला आहे.

6) राजस्थानच्या दुय्यम शहरांमध्ये समावेशक पाणीपुरवठा व स्वच्छताविषयक पायाभूत सुविधा व सेवा पुरवण्यासाठी आशियाई विकास बँकेने (ADB) 300 दशलक्ष डॉलर (सुमारे 2,200 कोटी रुपये) कर्ज मंजूर केले आहे.

7) 27 सप्टेंबर 2020 रोजी नॉर्थ ईस्ट कौन्सिलचे अध्यक्ष तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते “डेस्टीनेशन नॉर्थ ईस्ट-2020” नामक महोत्सवाचे उद्‌घाटन करण्यात आले. “उदयोन्मुख आनंददायी स्थळे” ही या कार्यक्रमाची संकल्पना आहे.

8) प्रचलित साथीच्या पार्श्वभूमीवर ओडिशा सरकार 8 वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी रेडिओ पाठशाला कार्यक्रम सुरू करीत आहे.

संरक्षण सामग्री खरेदीतील ‘ऑफसेट’ धोरण रद्द :

राफेलसारखी लढाऊ विमाने तसेच, अन्य संरक्षणविषयक सामग्री खरेदी करताना दुसऱ्या देशांच्या सरकारशी होणाऱ्या करारांमध्ये भारतात गुंतवणूक करण्याची अट (ऑफसेट धोरण) रद्द करण्याचा निर्णय संरक्षण मंत्रालयाने घेतला आहे.

राफेल करारानुसार दासाँ कंपनीने तंत्रज्ञान हस्तांतरण करणे अपेक्षित असले तरी त्याबाबत कंपनीने कोणतीही अंतिम तारीख जाहीर केलेली नाही, असा ठपका ‘कॅग’ने ठेवला होता. याच करारांतर्गत एकूण करारमूल्याच्या ५० टक्के रक्कम भारतीय संरक्षण उत्पादक कंपन्यांमध्ये गुंतवण्याचेही बंधन आहे.

सन्य दलाला अधिक सुसज्ज बनवण्यासाठी अमेरिकेकडून ७२ हजार ‘असॉल्ट रायफल’ खरेदी केल्या जाणार आहेत. २२९० कोटींच्या खरेदी प्रस्तावाला संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी सोमवारी मंजुरी दिली. पूर्व लडाखमध्ये चीनशी झालेल्या संघर्षांनंतर लष्कराला अत्याधुनिक साधनसामग्री पुरवण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये ७२ हजार ४०० एसआयजी रायफल खरेदी करण्यात आल्या.

“डेस्टीनेशन नॉर्थ ईस्ट-2020” महोत्सवाचा शुभारंभ झाला :

27 सप्टेंबर 2020 रोजी नॉर्थ ईस्ट कौन्सिलचे अध्यक्ष तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते “डेस्टीनेशन नॉर्थ ईस्ट-2020” नामक महोत्सवाचे उद्‌घाटन करण्यात आले. “उदयोन्मुख आनंददायी स्थळे” ही या कार्यक्रमाची संकल्पना आहे.

ईशान्य भारत हा भारताचा पूर्वोत्तर प्रदेश आहे जो देशाच्या भौगोलिक आणि राजकीय प्रशासकीय विभागांचे प्रतिनिधित्व करतो. त्या भागात अरुणाचल प्रदेश, आसाम, मणीपूर, मेघालय, मिझोरम, नागालँड, सिक्कीम आणि त्रिपुरा अशी आठ राज्ये आहेत. तो प्रदेश 5,182 किलोमीटर आंतरराष्ट्रीय सीमा (एकूण भौगोलिक सीमेच्या सुमारे 99 टक्के) व्यापतो.

Leave a Comment