चालू घडामोडी | 29 ऑक्टोबर 2020

वन लायनर चालू घडामोडी

1) 27 ऑक्टोबर 2020 रोजी प्रथम ‘शांघाय सहकार्य संघटना (SCO) स्टार्टअप फोरम’ या कार्यक्रमाचा आरंभ केला गेला. कार्यक्रमाचे उद्घाटन भारताचे वाणिज्य व उद्योग मंत्री पीयूष गोयल यांच्या हस्ते झाले.

2) केंद्रीय सतर्कता (दक्षता) आयोग येत्या 27 ऑक्टोबर 2020 पासून ते 2 नोव्हेंबर 2020 पर्यंत सतर्कता (दक्षता) जागृती सप्ताहाचे पालन करीत आहे. दरवर्षी ज्या आठवड्यात सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती येते, त्या सप्ताहात हा सप्ताह पाळला जातो. सार्वजनिक जीवनात प्रामाणिकपणा आणि सत्यनिष्ठा यांबद्दलच्या आमच्या दृढनिश्चयाचे बळकटीकरण करण्यासाठी नागरिकांच्या सहभागाने हा सप्ताह साजरा करण्यात येतो.

3) 27 ऑक्टोबर 2020 रोजी भारत सरकारची टपाल सेवा (इंडिया पोस्ट) आणि अमेरिकेची टपाल सेवा (USPS) यांच्यादरम्यान टपालांच्या वाहतूकीविषयी सीमाशुल्कविषयक (कस्टम) माहितीचे इलेक्ट्रॉनिक पद्धतीने आदान-प्रदान करण्यासाठी करार झाला.

4) केरळ भाजीपाल्यासाठी किमान किंमत निश्चित करणारे पहिले राज्य ठरले आहे. राज्य सरकारने राज्यभरात विक्री केल्या जाणाऱ्या 16 प्रकारांच्या भाजीपाल्यासाठी त्याच्या उत्पन्न खर्चाच्या 20 टक्के जास्त किंमत ठरवली. या योजनेच्या अंतर्गत बाजारभाव कमी झाला तरीदेखील राज्य सरकार शेतकर्‍यांकडून भाजीपाला किमान किंमतीवर खरेदी करणार.

5) जम्मू-काश्मीरच्या उधमपुरातील ध्रुवा शहिद स्मारक येथे नॉर्दन कमांडने 27 ऑक्टोबरला 74 वा पायदळ दिन पारंपरिक पुष्पहार सोहळ्यासह साजरा केला.

16 Omni- role राफेल होणार भारतीय हवाई दलात सामील :

भारताने फ्रान्सला 36 राफेल विमानांची ऑर्डर दिली आहे. त्यातील पाच विमाने 29 जुलै रोजी अंबाला एअरबेसवर दाखल झाली. आता भारतीय हवाई दलाची क्षणता आणि ताकद आणखी वाढणार आहे. 16 Omni- role राफेल जेट लढाऊ विमानं एप्रिल 2021 पर्यंत भारतीय हवाई दलात सामील होणार आहेत.

भारतातही जेट इंजिन आणि त्यासाठी आवश्यक असलेल्या साधनसामग्रीची निर्मिती करण्याचं काम सुरू करणार असल्याची माहिती फ्रान्सची सर्वात मोठी जेट इंजिन तयार करणारी कंपनी सफरानकडून देण्यात आली.

हरयाणाचा सर्वोत्तम ‘अ‍ॅनिमिया मुक्त भारत’ निर्देशांक :

देशातल्या 29 राज्यांमध्ये हरयाणा राज्याचा सर्वोत्तम ‘अ‍ॅनिमिया मुक्त भारत’ (AMB) निर्देशांक असल्याचे आढळून आले आहे. ‘अ‍ॅनिमिया मुक्त भारत’ हा भारत सरकारचे आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय आणि संयुक्त राष्ट्रसंघ बाल निधी (UNICEF) यांचा एक संयुक्त उपक्रम आहे.

रक्तातल्या रक्तारुणाच्या (हीमोग्लोबिनाच्या) प्राकृतिक (सर्वसाधारण) प्रमाणात घट होण्याला किंवा तांबड्या कोशिकांची (पेशींची) संख्या कमी होण्याला ‘पांडुरोग (ॲनिमिया)’ किंवा ‘रक्तक्षय’ म्हणतात. तांबड्या कोशिका आणि रक्तारुण यांचा ऑक्सिजन वाहून नेण्याशी घनिष्ट संबंध असल्यामुळे पांडुरोगात ऑक्सिजन-न्यूनता उद‌्भवण्याचा नेहमी संभव असतो.

Leave a Comment