चालू घडामोडी | 28 जुलै 2020

केंद्रीय पर्यावरण मंत्री भारतातल्या व्याघ्र गणनेचा नवीन गिनीज विक्रम लोकांना समर्पित करणार :

29 जुलै 2020 रोजी आयोजित जागतिक व्याघ्र दिनाच्या पूर्वसंध्येला, केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर भारतातल्या व्याघ्र गणनेनी केलेला नवीन गिनीज विक्रम भारतीय नागरिकांना समर्पित करणार आहेत.

भारतात दर चार वर्षांनी होणाऱ्या ‘राष्ट्रीय व्याघ्र गणना 2018’ याच्या अहवालानुसार कॅमेराद्वारे केलेल्या जगातल्या सर्वात मोठ्या वन्यजीव सर्वेक्षणात भारतातल्या व्याघ्र गणनेनी नवीन गिनीज विश्व विक्रम स्थापित केला आहे.

सन 2018-19 मध्ये केलेले सर्वेक्षण हे संसाधन आणि माहिती या दोन्ही गोष्टी संग्रहीत करण्याच्या दृष्टीने आजपर्यंतचे सर्वात व्यापक सर्वेक्षण होते.

ठळक बाबी

  • नव्या गणनेनुसार, देशात सुमारे 2967 वाघ आहेत.
  • वर्तमानात, जागतिक संख्येच्या सुमारे 70 टक्के वाघ भारतात आहेत. वेगवेगळ्या 141 क्षेत्रात 26,838 ठिकाणी कॅमेरे बसविण्यात आले होते आणि त्याद्वारे 121,337 चौरस किलोमीटर (46,848 चौरस मैल) क्षेत्रफळाचे प्रभावी सर्वेक्षण करण्यात आले.
  • या सापळा रुपी कॅमेऱ्यांनी वन्यजीवांची 34,858,623 छायाचित्रे हस्तगत केली. त्यात 76,651 वाघ आणि 51,777 बिबट्या होते; बाकीचे इतर स्थानिक प्राणी होते.
  • वाघांची संख्या दुप्पट करण्याचा संकल्प निर्धारित वेळेच्या चार वर्ष आधीच भारताने पूर्ण केला आहे.

पाच राफेल विमानांचे भारताच्या दिशेने प्रस्थान :

पाच राफेल विमानांचा पहिला ताफा फ्रान्समधून भारताकडे येण्यास निघाला असून ही विमाने करारानुसार देण्यात येत आहेत. बहुउद्देशी असलेले हे लढाऊ विमान असून बुधवारी ही विमाने अंबाला येथील हवाई दलाच्या तळावर येणार आहेत.

राफेल विमानांच्या खरेदीचा करार भारताने पाच वर्षांपूर्वी केला होता. भारतीय हवाई दलाला फ्रान्सची दसॉल्ट कंपनी ३६ विमाने देणार असून त्यासाठी ५९ हजार कोटींचा करार झाला होता. फ्रान्सने भारताला यापूर्वीही जग्वार, मिराज, मायसियर विमानांचा पुरवठा केला होता.

एकूण दहा राफेल विमाने तयार असून त्यातील पाच देण्यात आली आहेत तर पाच अजून प्रशिक्षण कार्यक्रमासाठी फ्रान्समध्येच आहेत. फेब्रुवारी २०२१ पर्यंत भारताला सर्व ३६ राफेल विमाने दिली जाणार आहेत.

मिटिऑर क्षेपणास्त्रे

  • मिटिऑर क्षेपणास्त्राची प्रगत आवृत्ती असलेले बीव्हीआर क्षेपणास्त्र भारताला देण्यात आले असून ते एमबीडीएने तयार केले आहे.
  • ब्रिटन, जर्मनी, इटली, फ्रान्स, स्पेन आणि स्वीडन या देशांच्या समान शत्रूंविरोधात त्यांचा वापर केला जातो. मिटिऑर क्षेपणास्त्राला रॅमजेट मोटर असून ते खूप लांबपर्यंत जाऊ शकते.
  • राफेल विमानात भारताला सोयीचे अनेक बदल करून देण्यात आले आहेत, त्यात रडार वॉर्निग रिसीव्हर, लो बँड जॅमर्स, १० तासांचे फ्लाइट डाटा रेकॉर्डिग, इन्फ्रारेड शोध सुविधा, ट्रॅकिंग यंत्रणा या सुधारणांचा त्यात समावेश आहे.

ऑस्कर विजेत्या ऑलिव्हिया दी हॅविलन्द यांचे निधन :

‘गॉन विथ दी विन्ड’ तसेच अन्य हॉलिवूडपटांमधील अभिनयामुळे गाजलेल्या ऑलिव्हिया दी हॅविलन्द यांचे वयाच्या १०४ व्या वर्षी निधन झाले.

दुहेरी ऑस्कर विजेती असलेल्या या अभिनेत्रीची ओळख ‘दी फ्रॅगरन्ट क्वीन ऑफ दी हॉलिवूड कॉस्च्युम ड्रामा’ अशी होती. टोकिओ येथे जन्म झालेल्या ऑलिव्हिया कॅलिफोर्नियात लहानाच्या मोठय़ा झाल्या.

त्यांना १९४६ मधील ‘टू इच हिज ओन’ आणि १९४९ मधील ‘दी हेअर्स’ या चित्रपटांतील भूमिकांसाठी ऑस्कर पुरस्काराने गौरविण्यात आले होते.

युव्हेंटसचे सलग नववे विजेतेपद- सेरी-ए फु टबॉल स्पर्धा :

ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या अप्रतिम कामगिरीमुळे युव्हेंटसने सलग नवव्यांदा सेरी-ए फु टबॉल स्पर्धेच्या विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले. युव्हेंटसने रविवारी सॅम्पडोरियाचा 2-0 असा पाडाव करत दोन सामन्यांआधीच जेतेपदावर मोहोर उमटवली.

पाच वेळा ‘बलॉन डीऑर’ या प्रतिष्ठेच्या पुरस्कारावर नाव कोरणाऱ्या रोनाल्डोने करोनाच्या विश्रांतीनंतर सलग 11 सामन्यांत गोल करण्याचा विक्रम आपल्या नावावर के ला. त्याचबरोबर इटलीतील दुसऱ्या मोसमात 30 सामन्यांत 30 गोलचा टप्पा त्याने ओलांडला.

रोनाल्डोला आता सेरी-ए स्पर्धेत युव्हेंटसतर्फे सर्वाधिक गोलचा विक्रम आपल्या नावावर करण्यासाठी एका गोलची गरज आहे. 1933-34मध्ये फे लिस बोरेल यांनी हा विक्रम नोंदवला होता.

Leave a Comment