चालू घडामोडी | 27 जून 2020

डॉ. तात्याराव लहाने यांना राजर्षी शाहू महाराज पुरस्कार जाहीर :

यंदाचा राजर्षी शाहू महाराज पुरस्कार वैद्यकीय शिक्षण विभागाचे संचालक व नेत्ररोग तज्ज्ञ डॉ. तात्याराव लहाने यांना जाहीर झाला आहे. राजर्षी शाहू महाराज मेमोरियल ट्रस्टचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी डॉक्टर दौलत देसाई यांनी आज पत्रकार परिषदेमध्ये माहिती दिली.

एक लाख रुपये, स्मृती चिन्ह व मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.  करोना संसर्ग कमी झाल्यानंतर पुरस्कार वितरण केले जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे. मागील वर्षी हा पुरस्कार ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे देण्यात आला होता.

राजर्षी शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्ट, कोल्हापूर यांच्यावतीने दरवर्षी शाहू जयंतीनिमित्त समाज प्रबोधन, साहित्य, कला, संस्कृती, विज्ञान, संगीत, क्रीडा इत्यादी क्षेत्रात दीर्घकाळ उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्तीला अथवा संस्थेला हा पुरस्कार प्रदान करण्यात येतो.

सन १९८४ पासून आत्तापर्यंत भाई माधवराव बागल, व्ही. शांताराम, डॉ. बाबा आढाव, तर्कतीर्थ लक्ष्मणशात्री जोशी, गुरु हनुमान, नानासाहेब गोरे, चंद्रकांत मांढरे, कुसुमाग्रज, मायावती, न्या. पी. बी. सावंत, रॅंग्लर नारळीकर, आशा भोसले, राजेंद्रसिंह, प्रा. एन. डी. पाटील, कॉ. गोविंद पानसरे, भाई वैद्य, शरद पवार, पुष्पा भावे या मान्यवरांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

भारताचा जीडीपी दोन वर्ष फक्त एक टक्क्यांनी वाढणार –  IMF :

भारताचा जीडीपी दोन वर्ष फक्त एक टक्क्यांनी वाढणार असं वक्तव्य आंतरराष्ट्रीय नाणे निधीच्या मुख्य अर्थतज्ज्ञ गीता गोपीनाथ यांनी केलं आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.

भारताच्या अर्थव्यवस्थेला अनपेक्षित असा फटका बसला आहे. त्यामुळे भारताची अर्थव्यवस्था दोन वर्षे धीम्या गतीने प्रगती करेल तसंच भारताचा जीडीपी पुढची दोन वर्षे अवघा एक टक्क्याने वाढेल असं त्यांनी म्हटलं आहे.

सध्याच्या करोनाच्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशात करोनाच्या चाचण्या वाढवल्या पाहिजेत असाही एक सल्ला गीता गोपीनाथ यांनी दिला आहे. एवढंच नाही तर अर्थव्यवस्थेत सुधारणा आणायच्या असतील तर लघू आणि मध्यम उद्योग करणाऱ्यांना आणखी आर्थिक उभारी द्यावी लागेल असंही त्यांनी सुचवलं आहे.

स्वीस बँकांत पैसे ठेवणाऱ्यांमध्ये ब्रिटन अव्वल, तर भारत जगात ७७वा स्थानी :

ज्या देशांचे नागरिक व व्यावसायिक यांचा स्वीस बँकांत पैसा आहे, त्या देशांच्या जागतिक यादीत २०१९ मध्ये भारताची तीन स्थानांची घसरण झाली आहे. आदल्या वर्षी ७४ व्या स्थानी असलेला भारत २०१९ मध्ये ७७ व्या स्थानी आला आहे. स्वीत्झर्लंडच्या केंद्रीय बँकेने जारी केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार पहिल्या स्थानावर ब्रिटन कायम आहे.

स्वीस नॅशनल बँकेने (एसएनबी) वार्षिक बँकिंग आकडेवारी जारी केली आहे. त्यात ही माहिती देण्यात आली आहे. स्वीस बँकांत असलेल्या विदेशी नागरिकांच्या एकूण पैशात भारतीय नागरिक अथवा व्यावसायिकांच्या पैशाचे प्रमाण अत्यंत नगण्य ०.०६ टक्के आहे. स्वीस बँकांच्या भारतीय शाखांतील पैशाचाही यात समावेश आहे.

या तुलनेत ब्रिटिश नागरिकांचा यातील वाटा तब्बल २७ टक्के आहे. २०१९ मध्ये भारतीयांकडून स्वीस बँकांत (भारतीय शाखांसह) पैसा ठेवण्याचे प्रमाण ५.८ टक्क्यांनी घसरून ८९९ स्वीस फ्रँकवर (६,६२५ कोटी रुपये) आले. ही स्वीस बँकांनी एसएनबीला दिलेली अधिकृत आकडेवारी असून, यातून काळ्या पैशाचे कोणतेही सूचन होत नाही. याशिवाय भारतीय नागरिक, अनिवासी भारतीय अथवा इतरांनी तिसऱ्या देशाच्या संस्थांमार्फत स्वीस बँकांत ठेवलेल्या पैशाचा यात समावेश नाही.

ब्रिटन अव्वल स्थानावर : स्वीस बँकांत पैसा असणाºया सर्वोच्च पाच देशांत ब्रिटन, अमेरिका, वेस्ट इंडीज, फ्रान्स आणि हाँगकाँग यांचा समावेश आहे. स्वीस बँकांत असलेल्या एकूण विदेशी निधीत या पाच देशांचा वाटा ५0 टक्क्यांपेक्षाही अधिक आहे.

इंग्लिश प्रीमियर लीग फुटबॉल : लिव्हरपूलला जेतेपद

१९७०-८०च्या दशकात इंग्लिश प्रीमियर फु टबॉल लीगवर निर्विवाद वर्चस्व गाजवणाऱ्या लिव्हरपूलसारख्या अव्वल क्लबला विजेतेपदासाठी तब्बल ३० वर्षे प्रतीक्षा पाहावी लागली.

चेल्सीने दुसऱ्या क्रमांकावरील मँचेस्टर सिटीला २-१ असे पराभूत के ल्यामुळे लिव्हरपूलने १९९०नंतर प्रथमच इंग्लिश प्रीमियर लीगचे विजेतेपद संपादन केले. सामाजिक अंतराचे नियम आणि गर्दीसंबंधातील कायदे असतानाही अ‍ॅनफिल्ड स्टेडियमबाहेर एकत्र जमून लिव्हरपूलच्या चाहत्यांनी विजेतेपदाचा जल्लोष साजरा केला.

शेकडो चाहत्यांनी जमून फटाक्यांची आतषबाजी केली तसेच लिव्हरपूलच्या विजयाच्या घोषणाही दिल्या. लिव्हरपूल ८६ गुणांसह अग्रस्थानी असून मँचेस्टर सिटीला (६३ गुण) उर्वरित सात सामन्यांमध्ये २३ गुणांची पिछाडी भरून काढता येणार नसल्याने लिव्हरपूलला विजेता घोषित करण्यात आले.

Leave a Reply