चालू घडामोडी | 26 जुलै 2020

0

‘सार्वजनिक प्रशासनामधील उत्कृष्टतेसाठी पंतप्रधान पुरस्कार 2020’ यासाठी सुधारित योजना :

केंद्रीय ईशान्य प्रदेश विकास राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार), पंतप्रधान कार्यालय, कार्मिक, सार्वजनिक तक्रारी, निवृत्तीवेतन, अणुऊर्जा आणि अंतराळ विभागाचे राज्यमंत्री, डॉ. जितेंद्र सिंग यांनी ‘सार्वजनिक प्रशासनामधील उत्कृष्टतेसाठी पंतप्रधान पुरस्कार 2020’ यासाठी सुधारित योजना जाहीर केली आहे आणि त्यासंबंधी एका संकेतस्थळाचे लोकार्पण केले.

जागतिक बॉक्सिंग क्रमवारी बॉक्सर अमित पांघल अव्वलस्थानी :

‘एआयबीए’ने तब्बल १८ महिन्यांच्या कालावधीनंतर पहिल्यांदाच क्रमवारी जाहीर केली. आशियाई क्रीडा स्पर्धेतील सुवर्णपदक विजेता तसेच जागतिक रौप्यपदक विजेता भारताचा बॉक्सर अमित पांघल याने आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग महासंघाने (एआयबीए) जाहीर केलेल्या जागतिक क्रमवारीमध्ये पुरुषांच्या ५२ किलो वजनी गटात अव्वल स्थान प्राप्त केले आहे.

सहा जागतिक सुवर्णपदकांची मानकरी ठरलेल्या एम. सी. मेरी कोम हिला ५१ किलो वजनी गटात तिसरे स्थान मिळाले आहे. २०१८ च्या नवी दिल्ली येथील जागतिक सुवर्णपदक विजेती उत्तर कोरियाची पँग चोल-मी (२३५० गुण) आणि तुर्कीच्या बुसीनाझ काकीरोग्लू (२००० गुण) यांच्यानंतर मेरीने १५०० गुणांची कमाई करत तिसरा क्रमांक पटकावला आहे.

जागतिक रौप्यपदक विजेती मंजू राणी हिने ४८ किलो वजनी गटात ११७५ गुणांसह दुसरे स्थान मिळवले आहे. आसामच्या लव्हलिना बोर्गोहेन, जमुना बोरो आणि शिवा थापा यांनीही क्रमवारीत चांगली झेप घेतली आहे. ६९ किलो गटात लव्हलिनाने तिसरे स्थान पटकावले आहे.

५४ किलो गटात जमुना बोरो पाचव्या स्थानी आहे, तर शिवा थापा याने ६० किलो गटात १६व्या क्रमांकावर मजल मारली आहे. एल. सरिता देवी मात्र ६० किलो गटात २५ व्या स्थानी आहे.

संशोधनात्मक तंत्रज्ञान विकासासाठी भारत-रशिया भागीदारीचा 15 कोटी रुपयांचा निधी :

भारत सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाच्यावतीने भारत आणि रशिया या देशांच्या संयुक्त सहयोगातून संशोधन व विकास तंत्रज्ञान कार्यक्रम तयार करण्यात आला आहे. या भागीदारीसाठी लागणाऱ्या खर्चासाठी 15 कोटी रुपयांचा निधी उभारण्यात आला आहे.

यामध्ये दोन्ही देश संयुक्त तंत्रज्ञान मूल्यांकन, स्टार्टअप उद्योगांसाठी संयुक्त संशोधन तसेच तंत्रज्ञानाच्या विकासासाठी भागीदारी करणार आहेत. दोन्ही देशांमध्ये प्रदीर्घ काळापासून व्दिपक्षीय संशोधन सहकार्य करण्यात येत आहे. आता भारत आणि रशिया या देशांमध्ये संयुक्त तंत्रज्ञान मूल्यांकन आणि वाणिज्यिक कार्यक्रम सुरू होत आहे.

ठळक बाबी

  • भारतातली फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री (FICCI) आणि रशियातली FASIE संस्था यांच्या भागीदारीतून हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.
  • या कार्यक्रमानुसार पाच प्रकल्पांपर्यंत प्रत्येकी दोन वार्षिक चक्रांतर्गत निधी देण्यात येणार आहे. विज्ञान व तंत्रज्ञान विभागाचे सहकार्य आवश्यक असलेल्या प्रकल्पांची निवड यासाठी करण्यात येणार आहे.
  • कार्यक्रमामध्ये माहिती तंत्रज्ञान, ICT, वैद्यकीय आणि औषधोपचार, नवीकरणीय ऊर्जा, अंतराळ, पर्यायी तंत्रज्ञान, पर्यावरण, नवीन साहित्य, जैवतंत्रज्ञान, रोबोटिक्स आणि ड्रोन तंत्रज्ञान या क्षेत्रातल्या प्रकल्पांचा विचार करण्यात येणार आहे.
  • विज्ञान व तंत्रज्ञान विभागाच्यावतीने FICCI हा कार्यक्रम भारतामध्ये राबविणार आहे. योजनेनुसार भारतातल्या दहा लघु, मध्यम उद्योगांना किंवा स्टार्टअप उद्योगांना FICCI कडून दोन वर्षांमध्ये 15 कोटी रुपयांपर्यंत निधी देण्यात येणार.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here