चालू घडामोडी | 25 जुलै 2020

‘भारतात शिका’ कार्यक्रमाच्या अंतर्गत भारतात पहिल्यांदाच ‘Ind-SAT’ परीक्षेचे आयोजन :

‘भारतात शिका’ या कार्यक्रमाच्या अंतर्गत भारत सरकारच्या केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने दिनांक 22 जुलै 2020 रोजी पहिल्यांदाच भारतीय शैक्षणिक मूल्यांकन (Ind-SAT) परीक्षा घेतली.

ठळक बाबी

  • राष्ट्रीय चाचणी संस्थेतर्फे (NTA) प्रक्षेपित आंतरजाल पद्धतीने घेतलेल्या या परीक्षेत नेपाळ, इथिओपिया, बांग्लादेश, भुटान, युगांडा, टांझानिया, रवांडा, श्रीलंका, केनिया, झांबिया, इंडोनेशिया आणि मॉरीशस या देशांमधून सुमारे पाच हजार उमेदवार सहभागी झाले होते.
  • मंत्रालयाच्या अंतर्गत EdCIL (भारत) मर्यादित या सार्वजनिक उपक्रमाने आणि SII या अंमलबजावणी संस्थेनी या परीक्षेसाठी नोंदणी आणि इतर बाबींची पूर्तता केली.
  • Ind-SAT परीक्षेत मिळालेल्या गुणांच्या आधारे ‘भारतात शिका’ या कार्यक्रमाच्या अंतर्गत पदवी तसेच पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्तीसाठी निवड केली जाणार आहे.
  • भारतातल्या उच्च शिक्षण संस्थांमध्ये शिक्षण घेण्यासाठी परदेशी उमेदवारांना शिष्यवृत्ती प्रदान करण्याच्या उद्देशाने आशियाई तसेच आफ्रिकी देशांमध्ये Ind-SAT परीक्षेचे आयोजन करण्याच्या प्रस्ताव वित्तमंत्र्यांनी आपल्या अर्थसंकल्पिय भाषणात मांडला होता.
  • यावर्षी प्रायोगिक तत्वावर 12 देशांमध्ये ही परीक्षा घेण्यात आली. भविष्यात इतरही देशांमध्ये ही परीक्षा आयोजित केली जाणार आहे.

रिपब्लिकन पक्षाचे अधिवेशन रद्द- डोनाल्ड ट्रम्प:

रिपब्लिकन पक्षाचे जॅक्सनव्हिल येथे होणारे अधिवेशन करोना विषाणूच्या प्रसारामुळे रद्द करण्यात आले आहे, हे अधिवेशन पुढील महिन्यात होऊन त्यात डोनाल्ड ट्रम्प यांची अधिकृत उमेदवारी जाहीर केली जाणार होती.

तर 24-27 ऑगस्ट दरम्यान हे अधिवेशन होणार होते. आता हे अधिवेशन पूर्ण स्वरूपात होणार नाही. व्हाइट हाऊसच्या पत्रकार परिषदेत ट्रम्प यांनी सांगितले की, फ्लोरिडामध्ये करोनाचा प्रसार जास्त असल्याने जॅक्सनव्हिल येथील अधिवेशन रद्द करण्याचा निर्णय घ्यावा लागला.

या अधिवेशनासाठी ही योग्य वेळ नाही कारण फ्लोरिडात करोनाचा प्रसार जास्त आहे. फ्लोरिडामध्ये करोनाचा प्रसार झाला असून त्या राज्यात 3,89,868 रुग्ण आहेत. कॅरोलिना व न्यूयॉर्क पहिल्या व दुसऱ्या क्रमांकावर आहेत.

लष्करात महिलांना कायम नियुक्ती :

भारतीय आर्मी मध्ये महिला अधिकाऱ्यांची स्थायी स्वरूपाची नियुक्ती करण्याबाबत आदेश संरक्षण मंत्रालयाने जरी केला आहे. याबाबत सर्वोच्च न्यायालयाने फेब्रुवारीत आदेश दिले होते.

या आदेशामुळे महिलांवर आता मोठ्या आणि अधिक जबाबदाऱ्या देण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. महिलांना आता पर्मनंट कमिशन, कमांड पद आणि पेन्शन या तिन्हीचा लाभ मिळणार आहे.

निकाराग्वा: आंतरराष्ट्रीय सौर युती (ISA) याचा 87 वा सभासद

निकाराग्वा हा आंतरराष्ट्रीय सौर युती (ISA) या सौर ऊर्जा निर्मिती क्षेत्रातल्या आंतरराष्ट्रीय भागीदारीमध्ये औपचारीकपणे सहभागी होणारा 87 वा देश ठरला आहे. देशाच्या प्रतिनिधींनी 22 जुलै 2020 रोजी ISAच्या कार्यचौकटीच्या संदर्भात असलेल्या करारावर स्वाक्षरी केली.

आंतरराष्ट्रीय सौर युती (ISA) विषयी

2015 साली स्वीकारण्यात आलेल्या पॅरिस हवामान करारनाम्याच्या पार्श्वभूमीवर चालवला जाणारा आंतरराष्ट्रीय सौर युती (International Solar Alliance -ISA) कार्यक्रम हा सर्वसामन्यांना स्वच्छ आणि स्वस्त ऊर्जा उपलब्ध करून देण्यासाठी भारत आणि फ्रान्स या देशांच्या पुढाकाराने चालू करण्यात आलेला एक जागतिक उपक्रम आहे.

भारतात हरयाणाच्या गुडगाव इथल्या राष्ट्रीय सौर ऊर्जा संस्था (NISE, गवलपहारी) येथे ISAचे मुख्यालय आणि अंतरिम सचिवालय आहे. ही भारतातली पहिली आंतरराष्ट्रीय व आंतर-सरकारी संघटना आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष फ्रँकोईस हॉलंड यांनी आंतरराष्ट्रीय सौर युती (ISA) याची स्थापना 30 नोव्हेंबर 2015 रोजी केली. आतापर्यंत 121 संभाव्य सदस्य देशांपैकी 87 देशांनी ISAच्या कार्यचौकटीच्या संदर्भात असलेल्या करारावर स्वाक्षरी केली आहे. त्यापैकी 58 देशांनी त्याला मान्यता दिली आहे.

Leave a Reply