चालू घडामोडी | 23 जून 2020

पोखरणच्या प्राचीन कुंभार कलेचे KVIC कडून पुनरुज्जीवन :

राजस्थान राज्यातल्या जैसलमेर जिल्ह्यातल्या पोखरण या छोट्या गावातल्या प्रसिध्द कुंभार (मातीची भांडी तयार करणे) कलेला गतवैभव प्राप्त करून देण्याच्या उद्देशाने खादी व ग्रामोद्योग आयोगाने (KVIC) 20 जून 2020 रोजी 80 कुटुंबाना 80 इलेक्ट्रिक मातीकाम चाकांचे वितरण केले.

इलेक्ट्रिक चाकांबरोबरच KVICने माती मिश्रणासाठीच्या 8 यंत्रांचेही वाटप केले. या यंत्रामुळे 800 किलो मातीचे 8 तासातच मिश्रण तयार करता येते. भांडी घडविण्यासाठी लागणारी ही माती कुंभारांनी हातानी मळायची ठरवल्यास 800 किलो मातीसाठी त्यांना 5 दिवस लागतात.

भारताची पहिली अणुचाचणी झालेल्या या गावाला टेराकोटा उत्पादनांची समृध्द परंपरा लाभली आहे. पोखरणमधे 300 कुंभार कुटुंबे अनेक दशके ही कुंभार कामात गुंतलेले आहेत. KVICने गावात 350 थेट रोजगार निर्माण केले आहेत. या 80 कुंभाराना KVICने 15 दिवसांचे प्रशिक्षण दिले असून त्यांनी उत्कृष्ट भांडी घडवली आहेत.

कुल्हड पासून ते फुलदाणी, मूर्ती, पारंपरिक भांडी, स्वयंपाकासाठी तसेच शोभेच्या वस्तू अशा विविध प्रकारच्या वस्तू हे कारागीर घडवतात. 400 रेल्वे स्थानकांवर खाण्याच्या वस्तूची केवळ मातीच्या / टेराकोटाच्या भांड्यात विक्री केली जाते; त्यामध्ये बारमेर आणि जैसलमेरचा समावेश असून ही ठिकाणे पोखरण जवळ आहेत.

नेपाळमधील नागरिकत्व कायदा भारतविरोधी :

नेपाळच्या नागरिकत्व कायद्यात भारताला प्रतिकूल असे बदल करण्यात येत असून नेपाळी नागरिकाशी विवाह करणाऱ्या परदेशी महिलेला सात वर्षांनंतर नैसर्गिक नागरिकत्व मिळणार आहे. नेपाळच्या विरोधी पक्षांनी या प्रस्तावाला विरोध केला असून त्यामुळे मधेशी लोकांची अडचण होणार असल्याचे म्हटले आहे.

मधेशी लोक सीमावर्ती भागात राहतात त्यामुळे त्यांचे भारताशी रोटीबेटी व्यवहार आहेत. नागरिकत्व कायद्यातील प्रस्तावित सुधारणेनुसार एखाद्या परदेशी महिलेने नेपाळी व्यक्तीशी विवाह केला तर तिला सात अधिकार वापरता येतील.

या महिलेला सात वर्षांनी नागरिकत्व मिळेल. रविवारी संसदीय समितीने या सुधारणा विधेयकास मंजुरी दिली या सुधारणानुसार या परदेशी महिलांना सात वर्षे नागरिकत्वाचे प्रमाणपत्र मिळणार नाही, पण त्यांना नेपाळमध्ये राहता येईल. त्यांचे आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक अधिकार अबाधित राहतील, त्यांना देशात उद्योग चालवता येईल. जन्म, मृत्यू, विवाह, घटस्फोट, स्थलांतर याची नोंदणी करता येईल.

या महिलांना ओळखपत्रे देण्यात येतील. महिला संघटनांनी यावर टीका केली असून त्यांनी म्हटले आहे की, जे परदेशी पुरुषनेपाळी महिलेशी विवाह करतील त्याबाबत यात काहीही म्हटलेले नाही. सध्या एखाद्या परदेशी पुरुषाने नेपाळी महिलेशी विवाह केला तर त्याला नागरिकत्वासाठी १४ वर्षे वाट पाहावी लागते.

रिलायन्सचा आणखी एक विक्रम; १५० अब्ज डॉलर्स बाजार मूल्य असणारी पहिली भारतीय कंपनी

मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडने (RIL) एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे. १५० अब्ज डॉलर्स बाजार मूल्य (मार्केट कॅप) असणारी रिलायन्स इंडस्ट्रीज ही पहिली भारतीय कंपनी ठरली आहे.

रिलायन्स इंडस्‍ट्रीजच्या शेअर्समध्ये सतत वाढ होत असल्याने मार्केट कॅपमध्येही वाढ होत आहे. सोमवारी सकाळी बीएसईमध्ये रिलायन्स इंडस्‍ट्रीजचे बाजार मूल्य 28,248.97 कोटी रुपयांनी वाढून 11,43,667 कोटी (150 अब्ज डॉलर्स) रुपये झाले.

सोमवारी बाजार सुरू झाल्यानंतर बीएसईमध्ये रिलायन्सच्या शेअर्सनी 2.53 टक्क्यांची उसळी घेत 1804.10 रुपयांचा विक्रमी स्तर गाठला. तर, एनएसईमध्येही कंपनीच्या शेअर्सनी 2.54 टक्क्यांनी उसळी घेत 1804.20 रुपयांचा स्तर गाठला. यापूर्वी शुक्रवारी रिलायन्स इंडस्ट्रीजने पुढील वर्षापर्यंत स्वत:ला पूर्णपणे कर्जमुक्त करण्याचे उद्दिष्ट आपल्या नियोजित वेळेपूर्वीच साध्य केल्याचे जाहीर केले.

गेल्या काही दिवसांपासून रिलायन्स जिओमध्ये अनेक परदेशी कंपन्यांनी गुंतवणूक केली. काही दिवसांपूर्वी सौदी अरेबियाच्या एका कंपनीनं रिलायन्स जिओमध्ये गुंतवणूक केली होती. ही रिलायन्स जिओमधील दहावी गुंतवणूक होती. रिलायन्स जिओच्या आतापर्यंत 24.70 टक्के हिस्स्याची विक्री करण्यात आली आहे. याद्वारे कंपनीनं 1.6 लाख कोटी रूपयांची रक्कम जमवली आहे.

Leave a Reply