चालू घडामोडी | 20 जून 2020

‘पीएम स्वनिधी योजना’ (किंवा प्रधानमंत्री स्ट्रीट व्हेंडर्स आत्मनिर्भर निधी): फेरिवाल्यांना भांडवल पुरविण्यासाठी योजना :

गृहनिर्माण व शहरी कल्याण मंत्रालय आणि भारतीय लघु-उद्योग विकास बँक (SIDBI) यांच्यामध्ये 19 जून 2020 रोजी एक सामंजस्य करार झाला. ‘पीएम स्वनिधी योजना’ (प्रधानमंत्री स्ट्रीट व्हेंडर्स आत्मनिर्भर निधी / PM SVANidhi) या योजनेची अंमलबजावणी करणारी संस्था म्हणून SIDBI संस्थेला नेमण्यासाठी हा सामंजस्य करार केला गेला आहे.

क्रेडिट गॅरंटी फंड ट्रस्ट फॉर मायक्रो अँड स्मॉल एंटरप्राइजेज (CGTMSE) द्वारे कर्ज देणाऱ्या संस्थांना कर्जाची हमी देण्याबाबत व्यवस्थापन करण्याचे कामही SIDBIला देण्यात आले आहे.

पंतप्रधानांच्या हस्ते व्यवसायिक खाणकामांसाठी कोळसा खाणींची लिलाव प्रक्रियेला सुरुवात :

18 जून 2020 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवी दिल्लीत व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे व्यवसायिक खाणकामांसाठी 41 कोळसा खाणींची लिलाव प्रक्रिया सुरू करण्यात आली. ‘आत्मनिर्भर भारत’ अभियानाच्या अंतर्गत, केंद्र सरकारने केलेल्या घोषणांच्या मालिकेतला हा एक भाग होता.

कोळसा मंत्रालयाने फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री (FICCI) याच्या सहकार्याने या कोळसा खाणींच्या लिलावासाठी प्रक्रिया सुरू केली. कोळसा खाणींच्या वाटपासाठी दोन टप्प्यांची इलेक्ट्रॉनिक लिलाव प्रक्रिया अवलंबली जात आहे. या लिलाव प्रक्रियेत, 41 कोळसा खाणी लिलावासाठी उपलब्ध आहेत, ज्यामध्ये पूर्णपणे अन्वेषण केलेल्या आणि अंशतः अन्वेषण केलेल्या खाणींचा समावेश आहे.

यामध्ये 4 कोकिंग कोळसा खाणींचा समावेश आहे ज्या पूर्णपणे अन्वेषण केलेल्या खाणी आहेत. या कोळशाच्या खाणी छत्तीसगड, झारखंड, मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि ओडिशा या राज्यात आहेत. लिलाव प्रक्रिया ही दोन टप्प्यांमधली निविदा प्रक्रिया असेल ज्यात तांत्रिक आणि आर्थिक बोलींचा समावेश आहे.

बॅडमिंटनपटू श्रीकांतची ‘खेलरत्न’साठी शिफारस :

भारताचा बॅडमिंटनपटू किदाम्बी श्रीकांतने दिलगिरी व्यक्त केल्यानंतर त्याची खेलरत्न क्रीडा पुरस्कारासाठी भारतीय बॅडमिंटन संघटनेकडून (बीएआय) शिफारस करण्यात आली आहे.

याउलट अर्जुन पुरस्कारासाठी शिफारस न झाल्याने जाहीर नाराजी व्यक्त करणाऱ्या प्रणॉयला संघटनेकडून कारणे दाखवा नोटीस पाठवण्यात आली आहे. मनिला येथे फेब्रुवारीमध्ये झालेल्या आशिया सांघिक बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्य फेरीत न खेळता श्रीकांत आणि एच. एस. प्रणॉय हे दोघेही बार्सिलोना येथे अन्य स्पर्धा खेळण्यासाठी निघून गेले.

मात्र प्रणॉय सातत्याने शिस्तभंग करत आहे. आतापर्यंत प्रणॉयच्या वागण्याकडे संघटनेकडून दुर्लक्ष करण्यात आले मात्र या वेळेस त्याला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे,’’ असे ‘बीएआय’चे सरचिटणीस अजय सिंघानिया यांनी सांगितले.

माजी गव्हर्नर उर्जित पटेल यांची एनआयपीएफपी अध्यक्षपदी नियुक्ती :

रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर उर्जित पटेल यांच्या खांद्यावर नवी जबाबदारी देण्यात आली आहे. नॅशनल इन्स्टीट्यूट ऑफ पब्लिक फायनॅन्स अँड पॉलिसीच्या (एनआयपीएफपी) अध्यक्षपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

यापूर्वी या पदाची जबाबदारी विजय केळकर यांच्या खांद्यावर होती. केळकर हे २०१४ पासून या पदावर कार्यरत होते. दरम्यान, उर्जित पटेल हे २२ जून रोजी एनआयपीएफपीच्या अध्यक्षपदाची सूत्रं हाती घेणार आहेत. एनआयपीएफपीनं यासंदर्भातील माहिती दिली.

“रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर उर्जित पटेल हे २२ जून २०२० पासून चार वर्षांसच्या कालावधीसाठी आमच्यासोबत जोडले जात असल्यानं आम्हाला आनंद होत आहे,” अशी प्रतिक्रिया एनआयपीएफपीकडून देण्यात आली.

एनआयपीएफपीचे मुख्य उद्दिष्ट सार्वजनिक अर्थशास्त्राशी संबंधित क्षेत्रात धोरण बनवण्यास योगदान देणं हे आहे. या संस्थेला अर्थ मंत्रालय, केंद्र सरकारसोबतच विविध राज्य सरकारांकडून वार्षिक अनुदानही मिळते.

Leave a Comment