चालू घडामोडी | 20 जुलै 2020

मंगळावर यान सोडणारा युएई हा पहिला मुस्लीम देश ठरला:

संयुक्त अरब अमिरात म्हणजेच युएईने मंगळ मोहिमेचे यशस्वी प्रक्षेपण केलं आहे. जपानच्या मदतीने युएईने ‘होप मार्स मिशन’चे जपानच्या तानेगाशिमा येथील लाँच पॅडवरुन यशस्वी प्रक्षेपण केलं. त्यामुळेच मंगळावर यान सोडणारा युएई हा पहिला मुस्लीम देश ठरला आहे.

स्थानिक वेळेनुसार सकाळी 6 वाजून 58 मिनिटांनी यान प्रक्षेपीत करण्यात आलं. पुढील सात महिन्यांमध्ये टप्प्याटप्प्यात हे यान मंगळाच्या दिशेने प्रवास करेल.

त्यानंतर 2021 मध्ये फ्रेब्रुवारी महिन्यामध्ये हे याने मंगळाच्या कक्षेत प्रवेश करुन तेथील हवामान आणि वातावरणातील बदलांसंदर्भात अभ्यास करणार आहे. 1.3 टन वजनाचे हे यान 50 कोटी किमीचे अंतर पार करणार आहे.

आर्थिक वर्ष 2018-19 साठीची प्राप्तिकर विवरणपत्रे स्वयंस्फूर्तीने भरण्याबाबत CBDTची ई-जनजागृती मोहीम :

करदात्यांच्या सुविधेसाठी आर्थिक वर्ष 2018-19 साठीची प्राप्तिकर विवरणपत्रे स्वतःहून भरण्याबाबत माहिती देणारी एक ‘ई-जनजागृती मोहीम’ 20 जुलै 2020 पासून सुरु करण्याचा निर्णय केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (CBDT) घेतला आहे. ही 11 दिवसांची मोहीम 31 जुलै 2020 रोजी संपणार आहे.

ठळक बाबी

  • जे करदाते करविवरण पत्र भरत नाहीत किंवा ज्यांचे करविवरणपत्रात त्रुटी किंवा अपूर्ण माहिती आहे, त्यांच्यासाठी विशेषत्वाने ही मोहीम राबवली जाणार आहे.
  • या मोहिमेचे उद्दिष्ट करदात्यांना विवरणपत्रे भरण्यासाठी त्यांची करविषयक / इतर व्यवहारांची माहिती ऑनलाईन उपलब्ध करुन देणे हे आहे.
  • प्राप्तीकर विभागाकडे या करदात्यांच्या ऑनलाईन व्यवहारांची जी माहिती असेल, ती त्यांना दिली जाणार. जेणेकरुन त्या आधारे, त्यांना स्वतःच, कोणाच्याही मदतीविना करविवरणपत्रे भरता येतील.
  • या करदात्यांना विभागाची नोटीस किंवा छाननी असे प्रकार टाळता येतील. ही ई-मोहीम करदात्यांच्या सुविधेसाठी राबवली जाणार आहे. त्याअंतर्गत कर विभाग करदात्यांना मेल किंवा एसएमएस पाठवून त्यांनी केलेल्या व्यवहारांची पडताळणी केली जाणार.
  • यात त्याच्या व्यवहारांची माहिती देणारे विविध स्त्रोत, जसे वित्तीय व्यवहार, टीडीएस, टीसीएस, परदेशातून आलेला पैसा इत्यादींचा वापर केला जाणार. त्याशिवाय, जीएसटी, निर्यात-आयात आणि समभाग बाजारात केलेल्या व्यवहारांशी संबंधित माहिती सुद्धा संकलित केली जाणार.

प्राप्तिकर विवरणपत्रे भरण्याची, त्यात दुरुस्ती करण्याची अंतिम तारीख 31 जुलै 2020 ही आहे. करदात्यांनी या ई मोहिमेत सहभागी व्हावे, असे आवाहन कर मंडळाने केले आहे.

बाएल बुद्धिबळ महोत्सव २०२० : हरिकृष्णला विजेतेपद

भारताचा ग्रँडमास्टर पी. हरिकृष्ण याने अप्रतिम कामगिरीचे प्रदर्शन करत सात फेऱ्यांमध्ये ५.५ गुणांची कमाई करत ५३व्या बाएल बुद्धिबळ महोत्सव २०२०चा भाग असलेल्या अ‍ॅसेंटस बुद्धिबळ ९६० स्पर्धेचे विजेतेपद पटकावले.

हरिकृष्ण सात फेऱ्यांमध्ये अपराजित राहिला. पोलंडच्या रॅडोस्लाव्ह वोतासेक याचा शेवटच्या फेरीतील पराभव हरिकृष्णच्या पथ्यावर पडला. स्वित्र्झलडच्या नोएल स्टडरने त्याला पराभवाचा धक्का दिला. त्यामुळे हरिकृष्णला अव्वल स्थानी मजल मारता आली.

जर्मनीच्या विन्सेन्ट के यमेर या १५ वर्षीय बुद्धिबळपटूने सर्वानाच आश्चर्याचा धक्का देत ५ गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर झेप घेतली. वोतासेकला ४.५ गुणांसह तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले.

नाईट ड्युटी अलाउंस लागू करण्याचा निर्णय घेतला- केंद्र सरकार:

केंद्र सरकारने सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशींना मान्यता देत केंद्रीय कर्मचाऱ्यासाठी रात्रपाळी भत्ता म्हणजेच नाईट ड्युटी अलाउंस लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात कार्मिक व प्रशिक्षण विभागाने (DoPT- Department of Personnel and Training) निर्देश जारी करत माहिती दिली आहे.

हे निर्देश 13 जुलै रोजी जारी करण्यात आले असून त्यांची अंलबजावणी 1 जुलै 2020 पासून लागू करण्यात आली आहे. या नव्या नियमांनुसार केंद्र सरकारने सर्व कर्मचाऱ्यांसाठी सध्याच्या व्यवस्थेनुसार विशेष ग्रेड पेवर आधारित नाइट ड्यूटी अलाउंस बंद केला आहे.

सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशी लागू करण्याआधी ग्रेड पेच्या आधारावर केंद्रीय कर्मचाऱ्यांना नाइट ड्यूटी अलाउंस दिला जायचा.

Leave a Reply