चालू घडामोडी | 02 जून 2020

0

शेतमालाला किमान आधारभूत किंमतीच्या दीडपट दर; केंद्रीय मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय :

शेतकऱ्यांसाठी सरकारनं मोठा निर्णय घेतला आहे. शेतमालाला किमान आधारभूत किंमतीच्या दीडपट दर देण्याचा निर्णयही बैठकीत घेण्यात आला. सरकारनं १४ पिकांसाठी किमान आधारभूत किंमत निश्चित केली आहे. करोना संकटाच्या काळातही शेतकऱ्यांनी न थांबता धान्य पिकवलं, असं म्हणत केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र तोमर यांनी शेतकऱ्यांचं कौतुक केलं.

१४ खरीप पिकांसाठी किमान आधारभूत किंमतीत वाढ करण्यात आलेल्या शेतकऱ्यांना खर्चापेक्षा ५० ते ६० चक्के अधिक उत्पन्न मिळणार असल्याचंही तोमर म्हणाले. दरम्यान,मक्याच्या आधारभूत किंमतीत ५३ टक्क्यांची वाढ करण्यात आली आहे. तर तूर, मूग यांच्या आधारभूत किंमतीत ५८ टक्क्यांची वाढ करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. ज्या शेतकऱ्यांनी शेतीसाठी कर्ज घेतलं आहे, त्यांना कर्जाची परतफेड करण्याचा कालावधी वाढवून देण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे.

शेतकऱ्यांना ऑगस्ट महिन्यापर्यंत या रकमेची परतफेड करता येणार आहे. शेतकऱ्यांनी करोना कालावधीत केलेल्या उत्पादनापैकी ३६० लाख मेट्रिक टन गहू आणि १६.०७ लाख मेट्रिक टन डाळ सरकारनं खरेदी केल्याचंही तोमर यांनी स्पष्ट केलं.

मस्क यांच्या स्पेस एक्स कंपनीची ऐतिहासिक अंतराळ भरारी यशस्वी :

दिनांक 31 मे 2020 रोजी अमेरिकेच्या एलॉन मस्क यांच्या मालकीची स्पेस एक्स या खासगी कंपनीने तयार केलेल्या अंतराळ यानातून NASAचे डो हार्ले आणि बॉब बेहन्केन हे दोन अंतराळवीर अंतराळात पाठविण्यात आले.

फ्लोरिडा इथल्या केनेडी स्पेस सेंटरमधून झेपावलेले हे यान आंतरराष्ट्रीय अवकाश केंद्र (ISS) याकडे पाठविण्यात आले. ‘क्र्यु ड्रॅगन’ असे या अंतराळ यानाचे नाव आहे. जगाच्या इतिहासात पहिल्यांदाच एखाद्या खासगी कंपनीने तयार केलेले यान अंतराळात झेपावले आहे. तसेच नऊ वर्षांपूर्वी शटल्स बंद झाल्यानंतर पहिल्यांदाच अमेरिकेच्या भूमीतून अमेरिकेचे अंतराळवीर अंतराळात झेपावले आहेत.

या यानासाठी लागणारे प्रक्षेपक देखील ही या कंपनीनेच तयार केले आहे. ‘फाल्कन 9’ असे त्याचे नाव आहे. यापूर्वी केवळ अमेरिका, रशिया आणि चीन सरकारच्या अंतराळ संस्थांना मानवाला अंतराळात पाठवता आले आहे. अंतराळवीरांनी केवळ नव्या कॅप्सूल प्रणालीतून प्रवास केला नसून त्यांनी NASAसाठी एका नव्या व्यवसायिक मॉडेलला सुरुवात केली आहे.

आता NASAकडे स्वतःचे यान नसणार परंतु स्पेसएक्सने दिलेली ‘टॅक्सी’ सर्व्हिस NASA वापरणार आहे, ज्यामुळे खासगी अंतराळ प्रवास व्यवसायाला एक दिशा मिळणार आहे.

आयुष मंत्रालयाची ‘माय लाईफ माय योगा’ व्हिडियो ब्लॉगिंग स्पर्धा :

भारत सरकारचे आयुष मंत्रालय आणि भारतीय सांस्कृतिक संबंध विषयक परिषद (ICCR) यांनी संयुक्तपणे ‘माय लाईफ माय योगा’ (जीवन योगा) ही व्हिडियो ब्लॉगिंग स्पर्धा आयोजित केली आहे. मंत्रालयाच्या वतीने 31 मे 2020 रोजी या स्पर्धेला सुरुवात झाली. ही चलचित्रपट स्पर्धा सर्व देशातल्या लोकांसाठी खुली आहे.

योग केल्याने व्यक्तीच्या जीवनावर होणारा परिवर्तनात्मक प्रभाव आणि येत्या 21 जूनला येणाऱ्या सहाव्या आंतरराष्ट्रीय योग दिनाशी संबंधित कार्यक्रम म्हणून स्पर्धेत लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.

स्पर्धेविषयी : कोविड-19 महामारीच्या पार्श्वभूमीवर, या स्पर्धेच्या निमित्ताने आयुष मंत्रालय आणि ICCR योग विषयी जागृती आणि आंतरराष्ट्रीय योग दिन 2020 यामध्ये नागरिकांनी सक्रीय सहभागी व्हावे यासाठी प्रोत्साहन देत आहे. फेसबुक, ट्वीटर आणि इस्टांग्राम या सोशल मिडिया मंचाद्वारे या स्पर्धेत सहभागी होता येणार आहे.

दोन टप्प्यात ही स्पर्धा होणार आहे. पहिल्या टप्प्यात आंतरराष्ट्रीय स्पर्धेत त्या-त्या देशातले विजेते निवडले जातील. त्यानंतर विविध देशातल्या विजेत्यामधून जागतिक पारितोषिक विजेते निवडले जातील. या स्पर्धेत सहभागी होणाऱ्यासाठी तीन श्रेणी ठेवण्यात आल्या आहेत – युवा (18 वर्षाखालील), प्रौढ (18 वर्षावरील) आणि योग व्यावसायिक तसेच महिला आणि पुरुष सहभागींसाठी स्वतंत्र.

या स्पर्धेच्या प्रवेशासाठी स्पर्धकाने योग विषयक तीन आसने (क्रिया, आसने, प्राणायाम, बंध किंवा मुद्रा) यांचा 3 मिनिटाचा चलचित्रपट आणि त्याबरोबर या योग साधनेमुळे आपल्या जीवनावर कसा परिणाम झाला याचा संदेश किंवा माहिती देणारा छोटा चलचित्रपटही अपलोड करावा लागणार.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here