चालू घडामोडी | 19 जून 2020

भारतीय पाम उद्योगाला KVICचे पाठबळ मिळाले :

खादी व ग्रामोद्योग आयोगाने (KVIC) नीरा आणि पामगुळ निर्मितीसाठी एक अनोखा प्रकल्प सुरू केला आहे. या क्षेत्रात देशातली रोजगार निर्मितीची क्षमता अधिक आहे.

नीराला सॉफ्ट ड्रिंक्सचा पर्याय म्हणून प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने तसेच आदिवासींना आणि पारंपारिक फासेपारधी यांच्या स्वयंरोजगाराला चालना देण्यासाठी दिनांक 16 जून 2020 रोजी महाराष्ट्रातल्या पालघर जिल्ह्यातल्या डहाणू येथे हा प्रकल्प सुरू झाला. केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाच्या सहकार्याने हा प्रकल्प सुरू करण्यात आला आहे.

KVIC द्वारे 7 दिवसांचे प्रशिक्षण दिलेल्या 200 स्थानिक कारागीरांना नीरा काढण्यासाठी आणि पामगुळ तयार करण्यासाठी KVICच्या वतीने टूल किटचे वितरण केले. 15,000 रुपये किंमतीच्या या किटमध्ये फूड ग्रेड स्टेनलेस स्टील कढई, छिद्रित मोल्ड, कॅन्टीन बर्नर आणि नीरा काढण्यासाठी लागणारी इतर उपकरणे जसे चाकू, दोरी आणि कुऱ्हाड यांचा समावेश आहे. या उपक्रमामुळे 400 स्थानिक पारंपारिक फासेपारधींना थेट रोजगार उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.

डॉ. मदन देवकर्ण, सुनंदा गोरे, वानखडे, जगदाळे, दुगडूमवार यांना ‘मसाप’ पुरस्कार :

सन २०२० या वर्षासाठीच्या मराठवाडा साहित्य परिषदेच्या वतीने देण्यात येणाऱ्या उत्कृष्ट ग्रंथ पुरस्कारांची घोषणा गुरुवारी झाली. मसापचे अध्यक्ष प्राचार्य कौतिकराव ठाले पाटील यांनी ही घोषणा केली. मसापच्या वतीने दरवर्षी प्रसिद्ध होणाऱ्या विविध वाङ््मय प्रकारांमधील उत्कृष्ट ग्रंथांना हे पुरस्कार देण्यात येतात.

यंदा नरेंद्र मोहरीर वाङ््मय पुरस्कारासाठी औरंगाबाद शहरातील डॉ. मदन देवकर्ण यांच्या “मराठवाड्यातील साहित्य आणि संशोधन’ व डॉ. बाळू दुगडूमवार यांच्या “बाबा आमटे : व्यक्तित्व, कवित्व व कर्तृत्व’ या ग्रंथांना विभागून मिळाला आहे. या पुरस्काराचे स्वरूप ५ हजार रुपये असून हा दोन वर्षांतून एकदा देण्यात येतो, तर नरहर कुरुंदकर वाङ््मय पुरस्कारासाठी मनोज बोरगावकर यांच्या “नदीष्ट’ ची निवड झाली.

या पुरस्काराचे स्वरूप ३० हजार रुपये आहे. प्राचार्य म. भि. चिटणीस वाङ््मय पुरस्कार चंद्रकांत वानखडे यांच्या “गांधी मरत नाही’ या ग्रंथाला मिळाला. कै. कुसुमताई देशमुख काव्य पुरस्कारासाठी “असो आता चाड’ या कवितासंग्रहाची निवड करण्यात आली आहे.

ग्रामीण भागात रोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी “पंतप्रधान गरीब कल्याण रोजगार योजना” :

गावात परतलेल्या स्थलांतरित मजूर आणि ग्रामीण लोकांना मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात या उद्देशाने केंद्र सरकारने “गरीब कल्याण रोजगार योजना’ ही प्रमुख ग्रामीण रोजगार व सार्वजनिक पायाभूत सुविधा योजना देशात लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दिनांक 20 जून 2020 रोजी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून या अभियानाचे उद्घाटन होणार आहे. बिहार राज्यातल्या तालीहार (बेल्दौल तालुका, खगारीया जिल्हा) या गावात या अभियानाचा प्रारंभ करण्यात येणार आहे.

सहा राज्यांच्या 116 जिल्ह्यांमधली गावे सामाईक सेवा केंद्र तसेच कृषी विज्ञान केंद्रांच्या माध्यमातून या अभियानात सहभागी होणार आहेत.

इटालियन चषक फुटबॉल स्पर्धा : नापोलीला विजेतेपद

युव्हेंटसचा अव्वल खेळाडू ख्रिस्तियानो रोनाल्डो याला अंतिम फेरीत छाप पाडण्याची संधीच मिळाली नाही. गोलशून्य बरोबरीत सुटलेल्या या लढतीत नापोलीने पेनल्टी-शूटआऊटमध्ये ४-२ अशी सरशी साधून सहाव्यांदा इटालियन चषक फुटबॉल स्पर्धेचे विजेतेपद मिळवले.

नापोलीकडून पेनल्टी-शूटआऊटमध्ये लॉरेंझो इनसाइन, मॅटेओ पॉलिटानो, निकोला मॅक्सीमोव्हिक आणि अर्कादिस्झ मिल्क यांनी गोल केले. ‘‘रोनाल्डो आपला पूर्वीचा वेग मिळवण्यासाठी धडपडत आहे.

करोनामुळे इतक्या आठवडय़ांची विश्रांती मिळाल्यानंतर खेळावरील पकड सैल होणे स्वाभाविक आहे,’’ असे युव्हेंटसचे प्रशिक्षक मॉरिझियो यांनी सांगितले.

Leave a Reply