चालू घडामोडी | 19 जुलै 2020

अमेरिकेत आपत्कालीन तेल साठा तयार करण्यासाठी भारताचा करार :

भारत-अमेरिका धोरणात्मक ऊर्जा भागीदारीचा आढावा घेण्यासाठी दोन्ही देशांमध्ये 17 जुलै 2020 रोजी आभासी मंत्रीस्तरीय बैठक आयोजित करण्यात आली होती. कार्यक्रमात महत्वाच्या उपलब्धीवर भर देणे आणि सहकार्याच्या नव्या क्षेत्रांचा प्राधान्यक्रम ठरवणे यावर भर देण्यात आला.

अमेरिकेचे ऊर्जा सचिव डेन ब्र्लोलीएट आणि भारताचे पेट्रोलियम व नैसर्गिक वायू मंत्री धर्मेंद्र प्रधान उपस्थित होते. या बैठकीत भारताने आपत्कालीन परिस्थितीत वापर करता यावा या हेतूने अमेरिकेत इंधन तेलाची साठवणूक करण्यासाठी संयुक्त राज्ये अमेरिका या देशासोबत आभासी पद्धतीने एक सामंजस्य करार केला आहे.

ठळक बाबी

  • भारताच्या ऊर्जा सुरक्षेच्या दृष्टीने हा करार अतिशय महत्वाचा ठरतो. करारानुसार, इंधनसाठ्यांसाठी अमेरिका भारताला मदत करणार आहे.
  • तसेच तेलाची साठवणूक करण्यासाठी अमेरिकेच्या इंधन साठवण केंद्राचा वापर भारत करू शकतो. अमेरिकेकडे 71.40 कोटी बॅरल इतकी ‘धोरणात्मक इंधन’ साठवणूक (SPR) क्षमता आहे.
  • आपत्कालीन इंधन तेलाच्या पुरवठ्याच्या बाबतीत अमेरिका जगात आघाडीवर आहे. यामुळे इंधन तेलाच्या नियमित पुरवठ्यात अडथळे आले, तर यामुळे होणाऱ्या परिणामांची तीव्रता कमी करता येते.
  • युद्धकाळात हा साठा देशाची इंधन आवश्यकता भागविण्यासाठी उपयोगी ठरतो. भारताकडे सध्या 3.80 कोटी बॅरल इतकी ‘धोरणात्मक इंधन’ साठवणूक (SPR) क्षमता आहे. पोडूर, मंगळूर, विशाखापट्टणम येथे भूमिगत टाक्यांमध्ये हे इंधन तेल साठविले जाते.
  • इंधन साठविण्यासाठी भारताने सौदी अरब आणि संयुक्त अरब अमिराती (UAE) सोबतही करार केला आहे. भारताला मागणीच्या 80 टक्के इंधन आयात करावे लागते.

आंतरराष्ट्रीय हवाई प्रवासासाठी भारताचा अमेरिका, फ्रान्स, जर्मनी यांच्यासोबत ‘एअर बबल’ करार :

कोविड-19 महामारीमुळे बंद पडलेल्या आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक सेवेला काही निवडक देशांसाठी पुन्हा चालू करण्याच्या उद्देशाने भारताने संयुक्त राज्ये अमेरिका, फ्रान्स, जर्मनी या देशांच्या सोबत द्विपक्षीय ‘एअर बबल’ करार केले आहेत.

महामारीमुळे बंद पडलेल्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय विमानसेवा क्षेत्राला आर्थिक फटका बसला आहे. त्यामुळे लवकरात लवकर विमान सेवा सुरु कारण्याची मागणी करण्यात येत होती. अखेर अमेरिका, फ्रान्स आणि जर्मनीबरोबर करार करून या देशांमध्ये विमान सेवा सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला.

भारत इस्रायलकडून घेणार रणगाडा उडवणारे ‘स्पाइक मिसाइल’ :

भारतीय लष्कराकडून स्पाइक क्षेपणास्त्राची ही दुसरी ऑर्डर इस्रायलला देण्यात येणार आहे. नियंत्रण रेषेजवळ तैनात असलेल्या तुकडयांसाठी १२ स्पाइक लाँचर्स आणि २०० क्षेपणास्त्र खरेदी करण्यासंबंधीचा प्रस्ताव लष्कराने मांडला आहे. मागच्यावर्षी बालाकोट एअर स्ट्राइकनंतर सरकारने विशेष खरेदीचे अधिकार दिले होते.

त्यावेळी सुद्धा इतक्याच संख्येने लाँचर्स आणि क्षेपणास्त्रे खरेदी करण्यात आली. लष्कराने पाकिस्तानला लागून असलेल्या सीमेवर ही स्पाइक क्षेपणास्त्र तैनात केली आहेत. आता नवीन खरेदी करण्यात येणारी क्षेपणास्त्र चीनला लागून असलेल्या सीमेवर तैनात करण्यात येतील.

अमेरिकेची भारतात ४० अब्ज डॉलरपेक्षा अधिक गुंतवणूक :

अमेरिकेची भारतातील थेट परकीय गुंतवणूक ४० अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त असल्याचे भारत केंद्री उद्योग गटाने म्हटले आहे. करोना साथीनंतर अनेक अमेरिकी कंपन्यांनी भारत व त्याच्या नेतृत्वावर विश्वास दाखवून तेथे गुंतवणूक केली आहे, असे यूएस-इंडिया स्ट्रॅटेजिक अँड पार्टनरशिप फोरमचे अध्यक्ष मुकेश आघी यांनी म्हटले आहे.

या वर्षी आतापर्यंत ४० अब्ज डॉलर्सपेक्षा अधिक गुंतवणूक झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले. अलीकडेच गुगलने भारतात २० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक केली असून फेसबुक  ट्विटर यांनीही गुंतवणुकीच्या घोषणा केल्या आहेत. भारतात गुंतवणूक करण्याबाबत उद्योजकांचा विश्वास वाढला आहे. भारत ही मोठी बाजारपेठ आहे. याशिवाय मध्य पूर्व व अतिपूर्वेकडील देशातूनही भारतात गुंतवणूक होत आहे असे त्यांनी स्पष्ट केले.

Leave a Comment