चालू घडामोडी | 17 जून 2020

0

‘पशुपतिनाथ’च्या सांडपाणी व्यवस्थेसाठी भारताची नेपाळला २.३३ कोटींची मदत :

भारताने नेपाळ येथील पशुपतिनाथ मंदिरात २.३३ कोटी रुपये खर्चून सांडपाणी व स्वच्छता सुविधा उभारून देण्याचे ठरवले आहे. पशुपतिनाथ मंदिरात हजारो लोक दर्शनासाठी येतात, त्यामुळे तेथे अनारोग्याचा धोका नेहमीच असतो, त्यासाठी ही व्यवस्था करण्यात येत आहे.

नेपाळ-भारत मैत्री विकास भागीदारी प्रकल्पात ही सुविधा उभारून दिली जाणार आहे. सोमवारी भारतीय दूतावास, नेपाळचे संघराज्य मंत्रालय व सामान्य प्रशासन तसेच काठमांडू महानगर शहर प्रशासन यांच्यात सांडपाणी व स्वच्छता व्यवस्था उभारण्याचा समझोता करार झाला. भारताने यासाठी २.३३ कोटी रुपये देण्याचे मान्य केले असून काठमांडू महानगर शहर प्रशासन त्या प्रकल्पाची अंमलबजावणी करणार आहे.

नेपाळने ठरवलेल्या निकषानुसार १५ महिन्यांत हा प्रकल्प उभा करण्यात येणार आहे. पशुपतिनाथ हे नेपाळमधील मंदिर सर्वात मोठे असून ते बागमती नदी किनारी आहे. भारत व नेपाळमधून तेथे रोज भाविक येत असतात. नेपाळने अलिकडेच नवीन राजकीय नकाशा मंजूर करून त्यात भारतातील उत्तराखंड राज्यातील लिपुलेख, कालापानी, लिपियाधुरा या भागांवर दावा सांगितला आहे. त्याबाबत घटनादुरुस्तीला तेथील संसदेच्या कनिष्ठ सभागृहाने मंजुरी दिली होती.

“कृत्रिम बुद्धिमत्ता विषयक जागतिक भागीदारी” यात भारत सहभागी :

“कृत्रिम बुद्धिमत्ता विषयक जागतिक भागीदारी (Global Partnership on Artificial Intelligence अर्थात GPAI किंवा Gee-Pay)” याची स्थापना करण्यासाठी भारत सरकार अमेरिका, ब्रिटन, युरोपीय महासंघ, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, फ्रान्स, जर्मनी, इटली, जापान, मेक्सिको, न्यूझीलंड, कोरिया, सिंगापूर यासारख्या आघाडीच्या प्रमुख अर्थव्यवस्थांच्या समूहामध्ये सहभागी झाला आहे.

मानवी हक्क, सर्वसमावेशकता, विविधता, नवसंशोधन तसेच आर्थिक वाढीसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (Artificial Intelligence -AI) तंत्रज्ञानाचा जबाबदारीपूर्ण विकास आणि वापराबाबत मार्गदर्शन करण्यासाठी “कृत्रिम बुद्धिमत्ता विषयक जागतिक भागीदारी” (GPAI) हा अनेक हितधारकांचा आंतरराष्ट्रीय उपक्रम आहे.

“कृत्रिम बुद्धिमत्ता विषयक जागतिक भागीदारी” (GPAI) एका सचिवालयाद्वारे व्यवस्थापित केली जाणार आहे, ज्याचे यजमानपद पॅरिस या शहरातली आर्थिक सहकार व विकास संघटना (OECD) तसेच मॉन्ट्रियल (कॅनडा) आणि पॅरिस (फ्रान्स) या शहरांमध्ये असणारी तज्ञांची दोन केंद्रे हे भूषवतील.

  • ठळक बाबी : सहभागी देशांचा अनुभव आणि विविधता यांचा उपयोग करून कृत्रिम बुद्धिमत्तेच्या आसपासची आव्हाने आणि संधी अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी अशा प्रकारचा हा पहिलाच उपक्रम आहे.
  • हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी, कृत्रिम बुद्धिमत्तेशी संबंधित प्राधान्यक्रमांवर आधारित उपक्रमांना सहाय्य करून कृत्रिम बुद्धिमत्तेशी संबंधित सिद्धांत आणि कृती यांच्यातले अंतर कमी करण्याचा या उपक्रमाचा प्रयत्न असणार आहे.
  • भागीदार आणि आंतरराष्ट्रीय संघटनांच्या सहकार्याने GPAI कृत्रिम बुद्धिमतेच्या जबाबदार उत्क्रांतीला प्रोत्साहन देण्यासाठी उद्योग, नागरी समाज, सरकारे आणि शैक्षणिक क्षेत्रातल्या आघाडीच्या तज्ञांना एकत्र आणणार.
  • GPAI कोविड-19 विषाणूच्या विद्यमान जागतिक संकटाला चांगला प्रतिसाद देण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा कसा लाभ घेता येऊ शकतो, हे दर्शविण्यासाठी कार्यपद्धती विकसित करणार.

भारताने अलिकडेच राष्ट्रीय कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण आणि राष्ट्रीय कृत्रिम बुद्धिमत्ता संकेतस्थळ सुरू केले आहे; तसेच विकासाला पूरक मानवी दृष्टिकोनाचा समावेश आणि सबलीकरणासह शिक्षण, कृषी, आरोग्य सेवा, ई-कॉमर्स, वित्त पुरवठा, दूरसंचार इत्यादी विविध क्षेत्रातही कृत्रिम बुद्धिमत्तेचा लाभ उठवण्यास सुरवात केली आहे. संस्थापक सदस्य म्हणून GPAIमध्ये सामील झाल्यामुळे समावेशक वाढीसाठी डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करण्याच्या अनुभवाचा फायदा घेत कृत्रिम बुद्धिमत्तेच्या जागतिक विकासात भारताला आता सक्रियपणे सहभागी होता येणार.

‘इंडियन गॅस एक्सचेंज’ (IGX): भारतातला पहिला राष्ट्रव्यापी ऑनलाइन वितरण-व्यापार सुविधा मंच :

पेट्रोलियम व नैसर्गिक वायू तसेच पोलाद मंत्री धमेंद्र प्रधान यांच्या हस्ते ‘इंडियन गॅस एक्सचेंज’ (IGX) या नावाने भारतातल्या पहिल्या राष्ट्रव्यापी ऑनलाइन वितरण-व्यापार सुविधा मंचाच्या कार्याला सुरुवात करण्यात आली.

  • मुख्य बाबी : ‘इंडियन गॅस एक्सचेंज’ (IGX) याच्या माध्यमातून नैसर्गिक वायूच्या वितरणासाठी व्यापार मंच म्हणून कार्य करण्यात येणार आहे.
  • भारतामध्ये ऊर्जा बाजार मंचाचे पूर्ण स्वामित्व असलेली ‘इंडियन एनर्जी एक्सचेंज’ (IEX) या कंपनीची उपकंपनी म्हणून IGX कार्यरत राहणार आहे.
  • नैसर्गिक वायू बाजारपेठेतल्या सर्व सहभागींना प्रमाणित मानकांनुसार व्यापार करण्यासाठी ही नवीन कंपनी समर्थ असणार आहे.
  • या मंचामुळे ग्राहकांना कोणत्याही समस्येविना, अडथळ्याविना व्यापार करणे शक्य होणार आहे. IGX याचे कामकाज पूर्णपणे संकेतस्थळ-आधारित मंचच्या मदतीने करण्यात येणार आहे.

महावीर चक्र राजमोहन व्होरा यांचे निधन :

महावीर चक्र विजेते माजी लेफ्टनंट जनरल राजमोहन व्होरा यांचे करोनामुळे निधन झाले.

प्रत्यक्ष युद्धभूमीत बजावलेल्या कार्याबद्दल लष्करातील कार्यरत जवान किंवा अधिकाऱ्यांना हा महावीर चक्र पुरस्कार दिला जातो. तो लष्करातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा किताब मानला जातो. त्यांना सन 1972 साली हा पुरस्कार मिळाला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here