चालू घडामोडी | 16 जून 2020

0

देशी खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी फिट इंडिया चळवळ आणि मनुष्यबळ मंत्रालयात करार :

‘एक भारत, श्रेष्ठ भारत’ उपक्रमांतर्गत भारतातल्या 10 देशी खेळांना प्रोत्साहन देणार्‍या विशेष चित्रपटांची मालिका सुरू करण्यासाठी युवा कल्याण व क्रिडा मंत्रालयाचा ‘फिट इंडिया’ कार्यक्रम आणि मनुष्यबळ विकास मंत्रालयाचा शालेय शिक्षण व साक्षरता विभाग यांच्यादरम्यान करार झाला.

भारतीय तरुणांपर्यंत पोहचण्यासाठी आणि देशी खेळांच्या समृद्ध वारसा प्रदर्शित करण्याच्या प्रयत्नात हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. भारतीय खेळांविषयी जागृती निर्माण करणे आणि या खेळाशी संबंधित असलेल्या राज्यांविषयी जागृती करणे हे या कार्यक्रमाचे उद्दीष्ट आहे.

या कार्यक्रमातून गटका, कबड्डी, कलारिपयट्टू, खो-खो, मल्लखांब, रोल बॉल, स्के, शूटिंग बॉल, थांग-ता आणि रस्सीखेच या खेळांना प्रोत्साहन दिले जाणार आहे.

हिमा दासचं नाव खेलरत्न पुरस्कारासाठी पाठवलं :

भारताची आघाडीची महिला धावपटू हिमा दासची यंदाच्या राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आली आहे. आसाम सरकारने यंदाच्या वर्षासाठी हिमा दासचं नाव पाठवलं आहे. 2018 पासून हिमा दास आंतरराष्ट्रीय स्तरावर धडाकेबाज कामगिरी करत आहे.

यंदाच्या वर्षासाठी हिमा दोससोबत, भालाफेकपटू नीरज चोप्रा, कुस्तीपटू विनेश फोगट, टेबल टेनिसपटू मनिका बत्रा, महिला हॉकी संघाची कर्णधार राणी रामपाल, क्रिकेटपटू रोहित शर्मा यांची नावंही खेलरत्न पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आली आहेत.

2018 आणि 2019 ही वर्ष हिमा दाससाठी चांगली केली आहेत. आशियाई खेळांपासून अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये हिमाने पदकांची लयलूट केली आहे.

महाराष्ट्रामध्ये येणार तब्बल 16 हजार कोटींची गुंतवणूक:

एकीकडे कोरोनाशी लढत असताना महाराष्ट्राने उद्योग उभारणीत दमदार पाऊल टाकून, तब्बल 16 हजार कोटींच्या गुंतवणुकीचे सामंजस्य करार सोमवारी केले. उद्योग स्थापण्यात कोणत्याही अडचणी येऊ दिल्या जाणार नाहीत, अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली.

उद्योग विभागातर्फे मॅग्नेटिक महाराष्ट्र 2.0 (भाग दोन) चा शुभारंभ मुख्यमंत्री ठाकरे व उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या उपस्थितीत झाला. यावेळी विविध देशांचे वाणिज्यदूत, गुंतवणूकदार ऑनलाइन उपस्थित होते. अमेरिका, चीन, दक्षिण कोरिया, सिंगापूर आदी विविध 12 देशांतील गुंतवणुकदारांशी 16 हजार 30 कोटींचे सामंजस्य करार यात झाले.

तसेच व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे करारावर स्वाक्षऱ्या झाल्या. वर्ल्ड असोसिएशन आॅफ इन्व्हेस्टमेंट प्रमोशन एजन्सीज आणि यूएस इंडिया पार्टनरशिप फोरम सह द्विपक्षीय भागीदारी करारावर स्वाक्षºया करण्यात आल्या.

उद्योगांसाठी राज्यात सुमारे 40 हजार हेक्टर जमीन राखीव ठेवली आहे. विविध परवान्यांऐवजी आता 48 तासांत महापरवाना दिला जाईल आणि औद्योगिक कामगार ब्यूरो सुरू केला जाईल, अशी माहिती सुभाष देसाई यांनी दिली

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here