चालू घडामोडी | 15 ऑगस्ट 2020

‘सार्थक’: भारतीय तटरक्षक दलाचे चौथे गस्ती जहाज :

13 ऑगस्ट 2020 रोजी भारतीय तटरक्षक दलाच्या ‘सार्थक’ नामक गस्ती जहाजाचे जलावतरण करण्यात आले. तटरक्षक दलासाठी बनविण्यात येणाऱ्या पाच गस्ती जहाजांच्या मालिकेतले हे चौथे गस्ती जहाज आहे.

गोवा शिपयार्ड लिमिटेड या सार्वजनिक कंपनीने या जहाजाची रचना आणि बांधणी स्वदेशी तंत्रज्ञानाने केली आहे. जहाजात अत्याधुनिक अशी नौकानयन आणि संचार साधने, संवेदक आणि यंत्रणा बसविण्यात आल्या आहेत. हे जहाज विशेष आर्थिक क्षेत्राची गस्त, सागरी सुरक्षा आणि भारतीय तटरक्षक दलाच्या राष्ट्रहितासंबंधीच्या इतर कर्तव्यांची पूर्ती करणार.

मोहनचंद शर्मा, नरेश कुमार यांना सातव्यांदा शौर्य पदक :

बाटला हाऊस चकमकीत २००८ मध्ये मारले गेलेले दिल्लीचे पोलीस निरीक्षक मोहन चंद शर्मा यांना सातव्यांदा मरणोत्तर शौर्यपदक जाहीर करण्यात आले आहे. बाटला हाऊस येथे लपलेल्या पाच दहशतवाद्यांना पकडण्यासाठी ते पथकासह गेले होते.

२००९ मध्ये त्यांना अशोकचक्र देऊन गौरवण्यात आले त्यानंतरही अनेकदा त्यांना राष्ट्रपती पदकाने गौरवण्यात आले होते. स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला शौर्यपदके जाहीर करण्यात आली आहेत.

केंद्रीय राखीव पोलीस दलाचे सहायक कमांडंट नरेश कुमार यांनाही काश्मीर खोऱ्यातील दहशतवाद विरोधी मोहिमेत सातव्यांदा शौर्य पदक मिळाले आहे. शौर्य पदकात जम्मू-काश्मीर पोलिसांना एकूण ८१ तर केंद्रीय राखीव पोलीस दलास ५५ पदके जाहीर झाली आहेत. एकूण ९२६ पदके जाहीर करण्यात आली. त्यात शौर्य पदके, विशेष सेवा व इतर पदकांचा यात समावेश आहे.

उत्तर प्रदेश पोलिसांना २३ शौर्य पदके मिळाली असून दिल्ली पोलिसांना १६, महाराष्ट्र १४, झारखंड १२ या प्रमाणे पदके मिळाली आहे. केंद्रीय राखीव पोलीस दलाचे सहायक कमाडंट कुमार हे काश्मीरमध्ये दहशतवाद विरोधी पथकात काम करीत होते. त्यांनाही गौरवण्यात आले आहे. हैदराबादच्या राष्ट्रीय पोलीस अकादमीचे संचालक व आयपीएस अधिकारी अतुल कारवाल यांना दुसऱ्यांदा गौरवण्यात आले आहे.

५५ शौर्यपदकांपैकी ४१ जम्मू-काश्मीरला, १४ नक्षलविरोधी कारवायांसाठी छत्तीसगडला मिळाली आहेत. सीमा सुरक्षा दलाचे सहायक कमांडंट विनय प्रसाद यांना मरणोत्तर शौर्यपदक जाहीर झाले आहे. हवाई दलातील विंग कमांडर विशाक नायर यांनाही शौर्यचक्र जाहीर करण्यात आले आहे. लष्करातील लेफ्ट. कर्नल कृष्णसिंह रावत, मे. अनिल अरस व हवालदार आलोककुमार दुबे यांनाही शौर्यचक्र जाहीर करण्यात आले आहे.

क्रिडा मंत्रालयाचा राष्ट्रव्यापी ‘फिट इंडिया फ्रीडम रन’ कार्यक्रम :

केंद्रीय क्रिडा मंत्रालयाकडून 15 ऑगस्ट ते 2 ऑक्टोबर या कालावधीत सर्वात मोठ्या देशव्यापी ‘फिट इंडिया फ्रीडम रन’ नामक धावशर्यतीचे आयोजन केले जात आहे. केंद्रीय क्रिडामंत्री किरेन रिजीजू यांनी 14 ऑगस्ट 2020 रोजी या उपक्रमाचे उद्घाटन केले.

कोविड-19 महामारीच्या निकषांचे पालन करतानाच स्वतःला तंदुरुस्त राखण्याबाबत जनतेला प्रोत्साहित करण्याचा या उपक्रमाचा उद्देश आहे. सध्याची महामारीची स्थिती लक्षात घेऊन आणि वैयक्तिक अंतराच्या निकषांचे पालन करून या उपक्रमात सहभागी होणाऱ्या धावपटूंना त्यांच्या स्वतःच्या गतीने त्यांच्या सोयीनुसार कोणत्याही ठिकाणी धावण्यासाठी प्रोत्साहित करण्याचा सरकारने निर्णय घेतला आहे.

त्या व्यतिरिक्त धावपटू या अनेक दिवस धावण्याच्या उपक्रमाच्या कालावधीत मध्येच धाव खंडित करू शकतात. धावपटूंनी कापलेले एकूण अंतर आणि त्यासाठी घेतलेला वेळ याची माहिती GPS घड्याळाच्या मदतीने किंवा स्वतः नोंदवता येऊ शकतो.

Leave a Comment