चालू घडामोडी | 12 जून 2020

0

विविध व्यवसायात युवांना प्रशिक्षण देण्यासाठी NFLचा ITI सोबत करार :

केंद्र सरकारच्या “स्किल इंडिया” उपक्रमाला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने राष्ट्रीय खते मर्यादित (NFL) या केंद्रीय खते विभागाच्या सार्वजनिक क्षेत्रातल्या उपक्रमाने कारखान्याजवळच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थांसोबत (ITI) करार करीत आहे.

या कराराच्या अंतर्गत युवांना विविध व्यवसाय क्षेत्रात प्रशिक्षित केले जाणार आहे, ज्यामुळे अवजड आणि प्रक्रिया उद्योग क्षेत्रात असलेली त्यांच्या रोजगाराच्या संधीत वाढ होण्यास मदत होणार आहे.

ठळक बाबी : पंजाबमधल्या NFLच्या नांगल प्रकल्पाने तरुणांना 12 प्रकारचे व्यवसाय प्रशिक्षण देण्यासाठी ITI, नांगल या संस्थेसोबत सामंजस्य करार केला आहे. ड्युअल सिस्टम ऑफ ट्रेनिंग योजनेच्या अंतर्गत या विद्यार्थ्यांना कौशल्य प्रशिक्षण दिले जाणार आहे, ज्याअंतर्गत ते संस्थेत सैद्धांतिक कौशल्ये आणि NFL नांगल प्रकल्पात प्रत्यक्ष नोकरीचे प्रशिक्षण घेऊ शकणार.

ITI संस्थेसोबत या सामंजस्य करारावर स्वाक्षरी झाल्यानंतर NFL पंजाब राज्यात असा पुढाकार घेणारी सार्वजनिक क्षेत्रातली पहिली कंपनी बनली आहे. संस्थांमधून अधिकाधिक तरुणांना प्रशिक्षण देऊन ‘कुशल भारत’ अभियानाला प्रोत्साहन देण्यासाठी भविष्यात असे आणखी पर्याय शोधण्याची कंपनीची योजना आहे.

लॉकडाउनमुळे भारताच्या महत्वकांक्षी ‘मिशन गगनयान’चं उड्डाण रखडणार :

करोनाचा प्रसार रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या लॉकडाउनचा भारताच्या पहिल्या मानवरहित मिशन गगनयान मोहिमेला फटका बसण्याची शक्यता आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्था सध्या मिशन गगनयान मोहिमेवर काम करत आहे. या मोहिमेची तयारी सध्या सुरू असून, या मोहिमेला लॉकडाउनमुळे उशिर होण्याची शक्यता ‘इस्रो’च्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

चांद्रयान मोहीम शेवटच्या टप्प्यात अयशस्वी झाल्यानंतर भारतीय अंतराळ संशोधन संस्थेनं (इस्रो) मिशन गगनयान मोहिमेवर काम सुरू केलं आहे. भारताची ही पहिली मानवरहित अवकाश मोहीम आहे. या मोहिमेवर काम सुरू असताना देशात लॉकडाउन झाला. त्याचा परिणाम मिशन गगनयानवर होण्याची चिन्ह आहेत. यासंदर्भात ‘पीटीआय’ वृत्तसंस्थेनं इस्रोच्या अधिकाऱ्यांच्या हवाल्यानं वृत्त दिलं आहे.

“करोनामुळे काही प्रमाणात व्यत्यय आला आहे. पण अजून निश्चितपणे तसं सांगता येणार नाही. आमच्याकडे अजून सहा महिन्यांचा कालावधी आहे, त्यामुळे अंदाज घेण्याची गरज आहे. आम्ही ते जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहोत. मिशन गगनयान मोहिमेच्या वेळापत्रकात थोडा बदल होऊ शकतो. पण, संपूर्ण मूल्यमापन केल्यानंतरच हे लक्षात येऊ शकेल. सध्या याबाबत निश्चित काही सांगता येणार नाही.

इस्रोनं सध्या मिशन गगनयान मोहिमेवर लक्ष केंद्रीत केलं आहे. या मोहिमेतंर्गत सुरूवातीला मानवरहित दोन फ्लाईट्स पाठवण्याचं नियोजन संस्थेनं केलं आहे. यातील पहिली फ्लाईट्स डिसेंबर २०२० मध्ये, तर दुसरी फ्लाईट जुलै २०२१ मध्ये पाठवण्यात येणार आहे.

जागतिक बँकेचा “‘ग्लोबल इकॉनॉमिक प्रॉस्पेक्ट: जून 2020” अहवाल :

जागतिक बँकेचे अध्यक्ष डेव्हिड मालपास यांनी “‘ग्लोबल इकॉनॉमिक प्रॉस्पेक्ट” या शीर्षकाच्या अहवालाची नवीन आवृत्ती प्रसिद्ध केली आहे. अहवालानुसार –

2020-21 या आर्थिक वर्षात भारताची अर्थव्यवस्था 3.2 टक्क्यांनी घटण्याचा अंदाज आहे.

महामारीमुळे झालेल्या नुकसानामुळे 2020-21 या आर्थिक वर्षात जागतिक अर्थव्यवस्था 5.2 टक्क्यांनी आकुंचन पावण्याचा अंदाज आहे. महामारीमुळे उद्भवलेली मंदी ही 1870 सालानंतर पहिल्यांदाच पाहिली गेली आहे. 2020 साली महामारीमुळे देशांतर्गत मागणी व पुरवठा, व्यापार आणि वित्तपुरवठा विस्कळीत झाल्यामुळे प्रगत अर्थव्यवस्थांमध्ये आर्थिक क्रियाकलापांमध्ये सात टक्क्यांनी घट होण्याची शक्यता आहे.

2020-21 या आर्थिक वर्षात उदयोन्मुख बाजारपेठ आणि विकसनशील अर्थव्यवस्था 2.5 टक्क्यांनी आकुंचन पावण्याचा अंदाज आहे, जे की गेल्या 60 वर्षांत प्रथमच पाहिले गेले आहे.

दरडोई उत्पन्नात 3.6 टक्क्यांनी घट होण्याची अपेक्षा आहे, ज्यामुळे यावर्षी कोट्यवधी लोक अत्यंत दारिद्र्यात ढकलले जाणार आहेत. सध्याच्या अंदाजानुसार महामारीच्या मंदीमुळे जागतिक दरडोई GDP मध्ये 6.2 टक्क्यांनी घट होण्याचा अंदाज आहे.

जागतिक व्यापार, पर्यटन, वस्तूंच्या निर्यातीवर आणि बाह्य वित्तपुरवठ्यावर मोठ्या प्रमाणात अवलंबून असणाऱ्या देशांना महामारीचा सर्वात मोठा फटका बसत आहे. वर्ष 1870 नंतर 1876, 1885, 1893, 1908, 1914, 1917-21, 1930-32, 1938, 1945-46, 1975, 1982, 1991, 2009 आणि 2020 या वर्षांमध्ये जागतिक अर्थव्यवस्थेने 14 वेळा जागतिक मंदी अनुभवली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here