चालू घडामोडी | 11 जून 2020

इयत्ता पहिली ते बारावीपर्यंतचे शिक्षण वाहिन्यांवरुन प्रसारित करण्यासंदर्भात NCERT आणि रोटरी इंडिया यांच्यात सामंजस्य करार :

ई-शिक्षणाची प्रक्रिया अधिक विधायक आणि प्रभावी करण्याच्या दृष्टीने शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण राष्ट्रीय परिषद (NCERT) आणि रोटरी इंडिया या संस्थेच्यामध्ये डिजिटल माध्यमातून एक सामंजस्य करार करण्यात आला आहे. इयत्ता पहिली ते बारावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी NCERT टीव्ही वाहिन्यांवरून अभ्यासक्रम प्रसारित करण्याबाबतचा हा करार आहे. हे प्रसारण जुलै 2020 पासून उपलब्ध असणार आहे.

कोविड-19 महामारीच्या काळात घरात अडकलेल्या विद्यार्थ्यांचा अभ्यास विनाअडथळा चालू राहावा या उद्देशाने रोटरी इंडीया ह्यूमेनीटी फाउंडेशन आणि NCERT यांनी एकत्र येत मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या मार्गदर्शनाखाली केलेल्या या करारामुळे NCERTचे मान्यताप्राप्त अभ्यासक्रम ई-शिक्षण मार्फत देशभरातल्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवले जाणार आहे.

  • ठळक बाबी : ई-शिक्षण अभ्यासक्रम केंद्र सरकारच्या ‘दीक्षा’ या मोबाईल अॅपवरूनही उपलब्ध असणार आहे.
  • सध्या हा अभ्यासक्रम हिंदी भाषेत (आणि पंजाबी) उपलब्ध असून तो 12 राज्ये/केंद्रशासित प्रदेशातल्या 10 लक्ष विद्यार्थ्यासाठी त्वरित उपलब्ध केला जाणार आहे.
  • तसेच येत्या काही महिन्यात सर्व प्रादेशिक भाषांमध्ये तो भाषांतरित केला जाणार आहे.
  • ‘विद्यादान-2.0’ या अभियानाच्या अंतर्गत, रोटरी इंटरनॅशनल NCERTला पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी हिंदी भाषेतल्या अभ्यासक्रमाचा मजकूर पूरवणार आहे.
  • त्याशिवाय, विशेष गरजा असलेल्या विद्यार्थ्यांसाठी देखील रोटरी क्लब आवश्यक ती साधने आणि अभ्यासक्रम पुरवणार आहे. तसेच प्रौढ साक्षरता अभियानातही पूर्ण योगदान देणार आहे. ते शिक्षकांसाठीच्या प्रशिक्षणासाठीही अभ्यासक्रम देणार आहेत.

विविध योजना आणि उपक्रम, जसे की ऑपरेशन डिजिटल बोर्ड, दीक्षा, ई-पाठशाला, स्वयं आणि स्वयंप्रभा अशा उपक्रमांच्या माध्यमातून तंत्रज्ञान, कल्पकता आणि शिक्षण यांची सांगड घालण्याचा प्रयत्न केंद्र सरकार करीत आहे.

मायक्रोसॉफ्टचा फंड एम१२ भारतात; बंगळुरूत उघडले जगातील पाचवे कार्यालय

मायक्रोसॉफ्टचा प्रीमियर व्हेंचर फंड एम १२ आता भारतातही आला आहे. २०१६ मध्ये सुरू झालेल्या या फंडचे पाचवे कार्यालय बंगळुरूत उघडले आहे. याआधी सॅनफ्रान्सिस्को, सिएटल, लंडन आणि तेल अवीवमध्ये त्यांचे कार्यालय होते.

एम १२ सर्वसाधारणपणे बी२बी कंपन्यांत गुंतवणूक करते. मायक्रोसॉफ्टअंतर्गत या प्रीमियर फंडला स्मार्टमनी नावाने अोळखले जाते. याचे उद्दिष्ट भारतासह जगभरातील अनोख्या स्टार्टअपमध्ये गुंतवणूक करणे हे आहे.

केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंग यांच्या हस्ते जम्मू येथील CAT खंडपीठाचे उद्‌घाटन :

केंद्रीय ईशान्य प्रदेश विकास राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार), पंतप्रधान कार्यालय तसेच कार्मिक, सार्वजनिक तक्रारी, निवृत्तीवेतन, अणुऊर्जा आणि अंतराळ राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंग यांच्या हस्ते व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे जम्मू-काश्मीर आणि लडाख या केंद्रशासित प्रदेशांसाठी केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरण (CAT) याच्या 18 व्या खंडपीठाचे उद्‌घाटन केले गेले.

ठळक बाबी : केवळ सरकारी कर्मचाऱ्यांच्या सेवेच्या बाबींसाठी जम्मूच्या कॅट खंडपीठाची स्थापना करण्यात आली आहे. त्यामुळे प्रकरणांचा जलद गतीने निपटारा होणार.

प्रशासकीय न्यायाधिकरणाच्या अंतर्गत येणाऱ्या व्यक्तींना त्यांच्या तक्रारी आणि सेवेच्या बाबतीत जलद दिलासा मिळू शकणार आहे. जवळपास 30,000 प्रलंबित प्रकरणांचा कालबद्ध आणि न्याय्य पद्धतीने निपटारा केला जाण्याचे अपेक्षित आहे.

आयआयटी मुंबई जगात १७२ व्या क्रमांकावर :

क्यू एस वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग 2021 मध्ये देशातील उच्च शिक्षण देणाऱ्या विद्यापीठ, संस्थांमध्ये आयआयटी मुंबईने पहिले स्थान मिळविले आहे. मुंबई आयआयटीने या रँकिंगमध्ये पहिल्या दोनशेमध्ये स्थान मिळवले असून मागील वर्षीच्या रँकच्या तुलनेत मात्र मुंबई आयआयटीची रँक यंदाच्या वर्षी घसरलेली पाहायला मिळाली.

मागील वर्षी मुंबई आयआयटीने क्यूएस रँकिंगमध्ये 152 वा स्थान मिळवले होते. तर यावर्षी मुंबई आयआयटीची रँकही 20 ने घसरून 172 वा रँक प्राप्त झाला आहे याशिवाय, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स बंगलोर 185 व्या स्थानी तर आयआयटी दिल्ली 193 व्या स्थानी आहे.

जगभरातील पहिल्या हजार उच्च शिक्षण देणाऱ्या संस्था, विद्यापीठात भारतातील 21 शिक्षण संस्थाचा समावेश यंदाच्या वर्षीच्या क्यूएस रँकिंगमध्ये आहे. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, बेंगलोरला भारतातील सर्वात उत्तम रिसर्च विद्यापीठाचा दर्जा या रँकिंगमध्ये मिळाला आहे.

Leave a Reply