चालू घडामोडी | 11 जुलै 2020

सीएच-47 एफ (आय) चिनूक लष्करी हेलिकॉप्टरचा पुरवठा बोईंग कंपनीकडून करण्यात आला:

भारतीय हवाई दलाने मागणी नोंदवलेल्या सर्व नव्या एएच-64 ई अपाचे आणि सीएच-47७ एफ (आय) चिनूक लष्करी हेलिकॉप्टरचा पुरवठा बोईंग कंपनीकडून करण्यात आला आहे. 22 अपाचे लढाऊ हेलिकॉप्टरपैकी अखेरच्या टप्प्यातील पाच हेलिकॉप्टर भारतीय हवाई दलाला हिंडान हवाई तळावर सुपूर्द करण्यात आली.

याआधी मार्चमध्ये बोईंगने एकूण 15 सीएच-47 एफ (आय) चिनूक भारीवहन हेलिकॉप्टरपैकी शेवटची पाच भारतीय हवाई दलाच्या ताब्यात दिली होती. ‘अपाचे’चे सर्वात आधुनिक रूप असलेली एएच-64 ई हेलिकॉप्टर भारताला मिळाली आहेत.

जगातील 20 देशांच्या संरक्षण दलांनी आपल्या ताफ्यात चिनूकचा समावेश केला आहे, किंवा त्याच्या खरेदीचे करार केले आहेत. गेल्या 50 वर्षांपासून भारी वहन श्रेणीतील हे एक अत्यंत विश्वसनीय हेलिकॉप्टर मानले जाते.

पंतप्रधानांच्या हस्ते 750 मेगावॉट क्षमतेच्या रीवा सौर प्रकल्पाचे राष्ट्रार्पण :

पंतप्रधान नरेंद्र मोदी याच्या हस्ते 10 जुलै 2020 रोजी मध्यप्रदेशातल्या रीवा शहरात 750 मेगावॉट क्षमतेचा सौर प्रकल्प देशाला समर्पित करण्यात आला.

मध्यप्रदेश ऊर्जा विकास महामंडळ आणि भारतीय सौर ऊर्जा महामंडळ (SECI) यांची संयुक्त उद्यम कंपनी असलेली रीवा अल्ट्रा मेगा सोलार लिमिटेड (RUMSL) या कंपनीने हे सौर उद्यान विकसित केले आहे. प्रकल्पाला केंद्रिय आर्थिक सहाय्य म्हणून 139 कोटी रुपये पुरविण्यात आले.

ठळक बाबी

  • प्रकल्पात सौरऊर्जैच्या अंतर्गत असलेल्या 500 हेक्टर भूखंडावर प्रत्येकी 250 मेगावॉट क्षमतेच्या (एकूण क्षेत्र 1500 हेक्टर) तीन सौर उत्पादक एककांचा समावेश आहे.
  • उद्यानाचा विकास झाल्यानंतर, सौर उद्यानात प्रत्येकी 250 मेगावॉट क्षमतेचे तीन सौर उत्पादक एकक विकसित करण्यासाठी रिव्हर्स ऑक्शनद्वारे महिंद्रा रिन्युएबल्स प्रायव्हेट लिमिटेड, ACME जयपूर सोलर पॉवर प्रायवेट लिमिटेड, आणि अरिनसन क्लीन एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड या कंपन्यांची RUMSLने निवड केली आहे.
  • रीवा सौर प्रकल्प हा ग्रीड पॅरिटी बॅरिअर तोडणारा देशातला पहिला सौर प्रकल्प आहे. दरवर्षीच्या कार्बनडाय ऑक्साइड उत्सर्जनाच्या तुलनेत या प्रकल्पामुळे सुमारे 15 लक्ष टन कार्बन उत्सर्जन कमी होणार.
  • राज्याबाहेरील संस्थात्मक ग्राहकांना पुरवठा करणारा हा पहिला अक्षय ऊर्जा प्रकल्प आहे. दिल्ली मेट्रोला प्रकल्पाकडून 24 टक्के ऊर्जा पुरविली जाणार आहे.

लॉयल टेक्स्टाईल मिल्स लिमिटेडने जगातली पहिली पुनर्वापराजोगी PPE किट विकसित केली :

भारतातल्या लॉयल टेक्स्टाईल मिल्स लिमिटेड या कंपनीने वैयक्तिक संरक्षक उपकरणांची (PPE) जगातली पहिली पुनर्वापराजोगी किट (म्हणजेच संच) विकसित केली आहे. त्यात ट्रिपल व्हायरल शील्ड म्हणजेच विषाणूपासून तिहेरी सुरक्षा देणारे तंत्रज्ञान वापरण्यात आले आहे.

ही PPE किट स्वित्झर्लंडच्या HeiQ आणि रिलायन्स इंडस्ट्रीज इंडिया या कंपन्यांच्या भागीदारीने तयार करण्यात आली आहे. हे परिधान तयार करण्यासाठी कापड रिलायन्स इंडस्ट्रीजने पुरविले, जे रोगाणू किंवा विषाणूला शरीरात प्रवेश करण्यास प्रतिबंध करते.

“HeiQ व्हिरोब्लॉक” या द्रव्यपदार्थाने त्यावर प्रक्रिया करण्यात आली, ज्यामुळे त्या कापडाची कोविड-19 विषाणूसारख्या विषाणूला नष्ट करण्याची कार्यक्षमता सुमारे 99.99 टक्के झाली आहे.

तसेच त्यावर तिसरा थर तैवानमधून बोलावलेल्या व्हायरल बॅरियर PU फिल्म लॅमिनेशनने बसविण्यात आला आहे, जे की जगात प्रथमच वापरले गेले आहे. ही नवी PPE किट दहावेळा धुऊन पुन्हा वापरली जाऊ शकते तर मास्क व वस्त्र 25 वेळा धुऊन पुन्हा वापरले जाऊ शकते.

मोहम्मद मुश्ताक अहमद यांचा राजीनामा :

राष्ट्रीय क्रीडा धोरणाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन के ल्याप्रकरणी क्रीडा मंत्रालयाने राजीनामा देण्यास सांगितल्यानंतर मोहम्मद मुश्ताक अहमद हे हॉकी इंडियाच्या अध्यक्षपदावरून वैयक्तिक बांधिलकीचे कारण देत पायउतार झाले आहेत.

हॉकी इंडियाचे कार्यकारी सदस्य तसेच महासंघाचे उपाध्यक्ष म्हणून जबाबदारी पाहणारे मणिपूरचे ज्ञानेंद्रो निगोमबाम यांची अहमद यांच्या जागी अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.

Leave a Reply