चालू घडामोडी | 10 सप्टेंबर 2020

0

पन्नास वर्षांत जगभरात वन्यजीवांची संख्या ६८ टक्क्यांनी घटली :

पर्यावरणाच्या हानीमुळे गेल्या पन्नास वर्षांत जगातील सस्तन प्राणी, पक्षी, उभयचर, सरपटणारे प्राणी आणि मासे यांच्या एकूण संख्येत दोन तृतीयांश घट झाल्याचा निष्कर्ष विश्व वनजीव निधी (डब्ल्यूडब्ल्यूएफ) संस्थेने मांडला आहे.

‘लिव्हिंग प्लॅनेट रिपोर्ट २०२०’ या अहवालातून हे धक्कादायक वास्तव समोर येते. वन्यजीवांची संख्या कमी होण्याबरोबरच कोविड १९ सारख्या पशुजन्य रोगांचादेखील उगम होत असल्याचा निष्कर्ष डब्ल्यूडब्ल्यूएफने मांडला आहे. दर दोन वर्षांनी जागतिक पातळीवर वन्यजीवांच्या सद्य:स्थितीचा आढावा डब्ल्यूडब्ल्यूएफमार्फत घेतला जातो.

१९७० ते २०१६ या काळातील अभ्यासासाठी १२५ तज्ज्ञांचा सहभाग होता. अहवालातील ‘लिव्हिंग प्लॅनेट निर्देशांक’नुसार पृष्ठवंशीय प्राण्यांची संख्या कमी होण्यामागे, जमिनीचा वापरबदल आणि प्राण्यांचा व प्राण्यांवर आधारित व्यापार ही दोन महत्त्वाची कारणे असल्याचे यात नमूद केले आहे. वनांच्या जमिनीचा वापरबदल होणे आणि अशाश्वत शेती ही कारणे नोंदविली आहेत.

गेल्या ५० वर्षांत सुमारे चार हजार पृष्ठवंशीय प्राण्यांचा अभ्यास यामध्ये करण्यात आला. त्यानुसार गोडय़ा पाण्याच्या अधिवासातील प्रजातींची संख्या ८४ टक्क्यांनी घटल्याचे दिसून येते. १९७० पासून दरवर्षी सुमारे चार टक्के या वेगाने ही संख्या कमी होत गेल्याचे अहवालात नमूद केले आहे. वन्यजीवांची संख्या घटणे आणि पर्यावरणाचा आणखी ऱ्हास रोखणे यासाठी पुढील दहा वर्षांचे लक्ष्य ठेवून काम करण्याची गरज या अहवालातून मांडली आहे.

या अहवालाच्या प्रकाशनादरम्यान डब्ल्यूडब्ल्यूएफच्या तज्ज्ञांनी २०३० पर्यंतच्या पाण्याच्या स्थितीवरदेखील भाष्य केले. तज्ज्ञांच्या मते २०३० पर्यंत पाण्याची मागणी ही उपलब्धतेपेक्षा दुप्पट होण्याची शक्यता आहे. तसेच २०२२ पर्यंत ६० टक्के जलचरांची स्थिती चिंताजनक होण्याची शक्यता मांडण्यात आली.

पायाभूत गुंतवणूक न्यासाच्या माध्यमातून पॉवरग्रिडच्या सहाय्यक कंपन्यांच्या मालमत्तेद्वारे उत्पन्नाला मान्यता :

8 सप्टेंबर 2020 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आर्थिक व्यवहारविषयक समितीने ‘InvIT’ म्हणजेच पायाभूत गुंतवणूक न्यासाच्या माध्यमातून पॉवरग्रिडच्या सहाय्यक कंपन्यांच्या मालमत्तेद्वारे उत्पन्नाला मान्यता दिली.

वीज क्षेत्रात एखादा सार्वजनिक उपक्रम प्रथमच InvIT पद्धतीच्या माध्यमातून त्याच्या मालमत्तेचे परीक्षण करून मालमत्ता पुनर्वापराचे कार्य करण्याची ही पहिलीच वेळ आहे आणि त्याद्वारे मिळालेल्या रकमेचा वापर नवीन आणि निर्माणाधीन भांडवल प्रकल्पांसाठी केला जाणार आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांना २०२१च्या नोबेल शांतता पुरस्कारासाठी नामांकन :

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना २०२१ च्या नोबेल शांतता पुरस्कारासाठी नामांकन मिळाले आहे. नॉर्वेच्या खासदाराने इस्रायल आणि संयुक्त अरब अमिरातीमध्ये झालेल्या ऐतिहासिक शांतता करारासाठी ट्रम्प यांचे नाव सुचवले आहे.

या करारामुळे दोन्ही देशातील जवळपास ७२ वर्षांचे वैर संपले आहे. इस्रायल आणि संयुक्त अरब अमिराती या देशांनी १३ ऑगस्ट रोजी अमेरिकेच्या मध्यस्थीने शांतता करार करत असल्याची घोषणा केली होती. या करारानुसार, इस्रायलला आता पश्चिम किनाऱ्यावरील काही भागांना आपल्या अधिकार क्षेत्रात घेण्याच्या योजनेला स्थगिती द्यावी लागणार आहे.

इस्रायल आणि संयुक्त अरब अमिराती दरम्यान गुंतवणूक, पर्यटन, थेट विमान सेवा, सुरक्षा आदी मुद्यांवर द्विपक्षीय करार करण्याचा निर्णय घेण्यात आला.

ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला:

विश्वातील अव्वल फुटबॉलपटूंपैकी एक म्हणून नावलौकिक मिळवणाऱ्या ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला. आंतरराष्ट्रीय कारकीर्दीतील गोलशतक साकारणाऱ्या रोनाल्डोने नोंदवलेल्या दोन गोलांच्या बळावर पोर्तुगालने नेशन्स लीग फुटबॉलच्या ‘क’ गटातील सामन्यात स्वीडनवर 2-0 असा विजय मिळवला.

35वर्षीय रोनाल्डो अशी कामगिरी करणारा फक्त दुसरा खेळाडू ठरला आहे. आंतरराष्ट्रीय फुटबॉल कारकीर्दीत 100 गोल झळकावण्याचे माझे स्वप्न साकार झाले आहे. परंतु एवढय़ावरच मी थांबणार नाही. भविष्यातही खेळाचा अधिकाधिक आनंद लुटून आणखी विक्रम रचण्याचा प्रयत्न करेन.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here