पृष्ठभाग विषाणूरहित करण्यासाठी ARCI आणि मेकीन्स या संस्थांनी तयार केलेले UVC आधारित निर्जंतुकीकरण कपाट :
भारत सरकाच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाचे स्वायत्त संशोधन व विकास केंद्र असलेले आंतरराष्ट्रीय चूर्ण धातुशास्त्र आणि नवीन सामग्री प्रगत संशोधन केंद्र (ARCI) येथील संशोधकांनी हैदराबादची मेकीन्स या कंपनीच्या सहकार्याने कोविड-19 विषाणूमुळे होणारा पृष्ठभागांवरील दुषितपणा टाळण्यासाठी रुग्णालयातल्या अत्यावश्यक नसणाऱ्या वस्तू, प्रयोगशाळेमधील पोशाख आणि संशोधन प्रयोगशाळांमधील PPEच्या निर्जंतुकीकरणासाठी “UV-C किरणांवर आधारित असलेले निर्जंतुकीकरण कपाट” तयार केले आहे.
दैनंदिन संपर्कामुळे वापरात आलेल्या वस्तूंवर विषाणू सहजपणे आढळतात, जे पुढे शरीराच्या संपर्कात आल्याने त्यांचा संसर्ग होण्याची शक्यता असते. अश्या परिस्थितीत वस्तूंचे निर्जंतुकीकरण होणे अत्यावश्यक असते. त्यामुळे हा शोध महत्वाचा ठरणार आहे.
याचा वापर व्यवसायिक आस्थापनांमध्ये आणि बऱ्याच देशांतर्गत वस्तूंमध्ये ग्राहकांना दाखविलेल्या वस्तूंचे निर्जंतुकीकरण करण्यासाठी देखील केला जाऊ शकतो.
254 nm (नॅनोमीटर) एवढी तरंगलांबी असलेली UV-C प्रकाशकिरणे विषाणूसाठी धोकादायक असतात आणि ते निष्क्रिय होतात, असे एका संशोधनात आढळून आले आहे.
हैदराबाद आयआयटीकडून करोना चाचणी संच विकसित:
हैदराबाद येथील भारतीय तंत्रज्ञान संस्थेने (आयआयटी) कोविड 19 चाचणी संच विकसित केला असून या किफायतशीर संचाच्या मदतीने वीस मिनिटांत चाचणी करता येते.
संशोधकांनी असा दावा केला, की ही पर्यायी चाचणी पद्धत रिव्हर्स ट्रान्सक्रिप्शन पॉलिमरेज चेन रिअॅक्शन (आरटी-पीसीआर) पद्धतीपेक्षा वेगळी आहे. या संचाची किंमत 550 रुपये असून ती जास्त उत्पादनानंतर साडेतीनशे रुपयांपर्यंत खाली आणता येईल. या संचासाठी पेटंट घेण्यात येणार असून इएसआयआयसी मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल या हैदराबादच्या संस्थेत त्याच्या चाचण्या घेण्यात आल्या आहेत.
या संचाला मान्यता मिळण्यासाठी भारतीय वैद्यक संशोधन परिषदेकडे अर्ज करण्यात आला आहे. या चाचणी संचांच्या मदतीने वीस मिनिटांत निकाल हाती येतो. त्यात लक्षणे असलेल्या व नसलेल्या दोन्ही प्रकारच्या रुग्णांची चाचणी करता येते, अशी माहिती हैदराबाद आयआयटीचे प्राध्यापक शिव गोविंद सिंह यांनी दिली. हा कमी किमतीचा संच असून कुठेही सहज नेता येतो.
यातील चाचणी पद्धत वेगळी असून त्यात कोविड 19 जनुक आराखडय़ातील विशिष्ट भागाच्या क्रमवारीचा आधार घेण्यात आला आहे. आयआयटी दिल्लीने त्यांच्या पीसीआर आधारित चाचणी संचाला आयसीएमआरकडून मान्यता घेतली आहे.
हैदराबाद आयआयटी संस्थेने असा दावा केला, की सध्याच्या चाचणी प्रक्रिया या शोध प्रक्रियेवर आधारित आहे. आमच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेली चाचणी ही शोध आधारित नसल्याने त्याची किंमत कमी आहे शिवाय त्यात अचूकतेशी तडजोड करण्यात आलेली नाही.
अभिमानास्पद! भारतीय हवामान विभागाचं अचूक अंदाजाबद्दल जागतिक हवामान संघटनेकडून कौतुक:
पाऊस आणि इतर नैसर्गिक संकटाबद्दल भारतीय हवामान विभाग अंदाज व्यक्त करतो. त्याचबरोबर धोकादायक संकट असेल, तर आधीच सूचना करून प्रशासनाला सावध करण्याच काम करतो. मात्र, पावसाच्या अंदाजावरून अनेक वेळा हवामान विभागावर विनोदही केले जातात.
मात्र, अम्फान चक्रीवादळाबद्दल भारतीय हवामान विभागानं व्यक्त केलेल्या अंदाजानं जागतिक हवामान संघटनाही प्रभावित झाली आहे. याबद्दल भारतीय हवामान विभागाचं संघटनेनं कौतुक केलं आहे.