चालू घडामोडी | 01 सप्टेंबर 2020

0

अर्थव्यवस्थेची अधोगती, विकासदर उणे २३.९ टक्के :

भारताचा सकल राष्ट्रीय उत्पादन अर्थात जीडीपीचा दर सरलेल्या एप्रिल ते जून तिमाहीत शून्याखाली घसरून २३.९ टक्क्यांनी आक्रसल्याचे, सोमवारी जाहीर झालेल्या आकडेवारीने स्पष्ट केले. तिमाहीगणिक आकडेवारी प्रसिद्ध करण्याच्या १९९६ पासून सुरू झालेल्या प्रघातापासून, नकारात्मक आर्थिक विकासाची ही सर्वात भयाण आकडेवारी असून, एकूणच आशियाई देशांच्या अर्थव्यवस्थांमधील सर्वात वाईट कामगिरीही आहे.

केवळ कृषी क्षेत्रात एप्रिल-जून तिमाहीत सकारात्मक वाढ राहिली, असे राष्ट्रीय सांख्यिकी विभागाची (एनएसओ) आकडेवारी दर्शविते. शाचे सकल राष्ट्रीय उत्पादन (२०११-१२ च्या स्थिर किमतीनुसार) २०२०-२१ आर्थिक वर्षांच्या प्रथम तिमाहीत २६.९० लाख कोटी रुपये अंदाजण्यात आले आहे, जे २०१९-२० च्या प्रथम तिमाहीत ३५.३५ लाख कोटी रुपये होते.

म्हणजे २०१९-२० च्या पहिल्या तिमाहीत दिसलेल्या ५.२ टक्क्यांच्या वाढीच्या तुलनेत ते २३.९ टक्क्यांनी आकुंचन पावले आहे, असे ‘एनएसओ’ने दिलेल्या निवेदनातून स्पष्ट केले आहे. करोनाच्या प्रादुर्भावापूर्वीही म्हणजे जानेवारी ते मार्च २०२० तिमाहीत अर्थव्यवस्थावाढीचा दर हा आठ वर्षांच्या नीचांकाला म्हणजे ३.१ टक्के नोंदविला गेला होता, तर मागील वर्षांत एप्रिल ते जून २०१९ तिमाहीत जीडीपीवाढीचा दर ५.२ टक्के असा होता.

बांधकाम क्षेत्रातून सकल मूल्यवर्धनाचे प्रमाण तिमाहीत उणे ५०.३ टक्के इतक्या गंभीर स्वरूपात आक्रसले, जो मागील वर्षी याच तिमाहीत ५.२ टक्के होता. उत्पादन क्षेत्राबाबत हेच प्रमाण उणे ३९.३ टक्के इतके आहे. मागील वर्षी याच तिमाहीत हे क्षेत्र ३ टक्के दराने वाढ करीत होते. खाणकाम क्षेत्रही २३.३ टक्क्यांच्या घरात आक्रसले आहे.

आतिथ्य, वाहतूक, दळणवळण, व्यापार या सेवांमध्ये तिमाहीत ४७ टक्क्यांचा उतार दिसून आला आहे. वीज, वायू, पाणीपुरवठा आणि अन्य सेवांचे अर्थव्यवस्थेतील मूल्यवर्धन गतवर्षी याच तिमाहीत ८.८ टक्के वाढले होते, ते यंदाच्या तिमाहीत ७ टक्के घट दर्शविणारे आहे.

भारताच्या पहिल्या महिला हृदयरोगतज्ज्ञ डॉ. पद्मावती यांचं निधन :

भारताच्या पहिल्या महिला हृदयरोगतज्ज्ञ डॉ. शिवरामकृष्ण अय्यर पद्मावती यांचं दि.२९ निधन झालं, त्या १०३ वर्षांच्या होत्या. एनएचआयच्या संस्थापक अध्यक्ष असलेल्या डॉ. पद्मावती यांना सन १९६७ मध्ये पद्मभूषण तर सन १९९२ मध्ये पद्मविभूषण किताबाने गौरविण्यात आले होते.

त्याचबरोबर त्यांना हार्वर्ड मेडिकल इंटरनॅशनल अवॉर्ड, डॉ. बी. सी. रॉय अवॉर्ड आणि कमला मेनन रिसर्च अवॉर्डनेही गौरविण्यात आले आहे. डॉ. पद्मावती या अविवाहित होत्या. सन १९५० पासून त्या दिल्लीच्या वैद्यकीय क्षेत्रात सक्रिय होत्या.

रंगून मेडिकल कॉलेज आणि त्यानंतर इंग्लंडमधून मेडिसीनमध्ये डिग्री घेतल्यानंतर त्या दिल्लीत आल्या. यावेळी त्यांच्याबाबत देशाच्या पहिल्या आरोग्यमंत्री राजकुमारी अमृत कौर यांना माहिती मिळाली. सन १९७६मध्ये त्यांनी मौलाना आझाद मेडिकल कॉलेजच्या प्रिसिंपल-डायरेक्टरपदाची जबाबदारी सांभाळली.

पदव्युत्तर अभ्यासक्रमांमध्ये सरकारी चिकित्सकांना आरक्षणाचा लाभ देण्यास राज्यांना परवानगी :

पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांमध्ये सरकारी सेवेत असलेल्या चिकित्सकांना आरक्षणाचा लाभ देण्यास सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारांना परवानगी दिली आहे. भारतीय वैद्यकीय परिषदेला पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांमध्ये सरकारी सेवेत असलेल्या चिकित्सकांना आरक्षण देणे किंवा न देणे याचा अधिकार नाही.

अलीकडेच चिकिस्तकांनी भारतीय वैद्यकीय परिषदेनी तयार केलेल्या ‘पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण अधिनियम-2000’च्या वैधतेला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. अधिनियमानुसार, पदव्युत्तर प्रमाणपत्र वैद्यकीय शिक्षण अभ्यासक्रमांमध्ये 50 टक्के जागा सरकारी सेवेत असलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांसाठी राखीव आहेत. परंतु MCIच्या नियमांनी पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांमध्ये या आरक्षणावर बंदी घातली आहे.

माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जींचे निधन :

माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचे दिल्लीत ८४ व्या वर्षी निधन झाले. प्रणव मुखर्जी १९६९ मध्ये इंदिरा गांधींच्या मदतीने काँग्रेचे राज्यसभेचे खासदार झाले. यानंतर १९७३ मधील काँग्रेस सरकारमध्ये ते मंत्री होते.

प्रणव मुखर्जी यांनी काँग्रेस सोडून नवीन पक्षा स्थापन केला. राष्ट्रीय समाजवादी काँग्रेस पक्ष बनवला. पण नंतर १९८९ हा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन झाला. १९८२ ते ८४ या काळात त्यांनी देशाचं अर्थमंत्रीपद भुषवलं. १९८० ते १९८५ या कालावाधीत राज्यसभेत ते लीडर ऑफ हाऊसही होते. प्रणव मुखर्जी यांनी विद्यासागर कॉलेजमध्ये शिक्षण घेतले.

त्यांनी राज्यशास्त्र आणि इतिहास विषयात एमए केले होते. याशिवाय त्यांनी एलएलबीही केली होती. १९९१ मध्ये राजीव गांधी यांची हत्या झाली. त्यानंतर प्लानिंग कमिशनच्या अध्यक्षपदी त्यांची निवड करण्यात आली. त्यानंतर पी.व्ही. नरसिंहराव यांच्या मंत्रिमंडळात प्रणव मुखर्जी हे परराष्ट्र मंत्री होते. २०१२ ते २०१७ या काळात ते भारताचे राष्ट्रपती होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here