चालू घडामोडी | 08 ऑगस्ट 2020

‘भारतीय दिवाळखोरी व नादारी मंडळ (तरलता प्रक्रिया) अधिनियम-2016’ मध्ये दुरुस्ती :

भारतीय दिवाळखोरी व नादारी मंडळाने (IBBI) “भारतीय दिवाळखोरी व नादारी मंडळ (तरलता प्रक्रिया) (तिसरी दुरुस्ती) सुधारित अधिनियम-2020” सूचित केले.

सुधारित नियमानुसार, पतदारांची समिती दिवाळखोर कंपनीची व्यवस्था बघणारा अधिकारी अर्थात लिक्विडेटर याला किती शुल्क द्यायचे ते निश्चित करणार. जिथे पतदारांच्या समितीने असे शुल्क निश्चित केले नसणार, तिथे या अधिनियमानुसार निर्धारित रकमेच्या आणि लिक्विडेटरने ने वितरीत केलेल्या रकमेच्या टक्केवारीनुसार शुल्क ठरवले जाणार.

प्रा. प्रदीपकुमार जोशी यूपीएससीचे अध्यक्ष :

प्रा. प्रदीप कुमार जोशी यांची शुक्रवारी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) अध्यक्षपदी निवड झाली. ते अरविंद सक्सेना यांची जागा घेतील.

जोशी यांचा कार्यकाळ १२ मे २०२१ पर्यंत असेल. छत्तीसगड आणि मध्य प्रदेशच्या लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष असलेले जोशी मे २०१५ मध्ये यूपीएससीचे सदस्य झाले.

राष्ट्रीय हातमाग दिन: 7 ऑगस्ट

7 ऑगस्ट 2020 रोजी भारतात “राष्ट्रीय हातमाग दिन” साजरा करीत आहे. हातमाग आणि हस्तकला क्षेत्राशी संबंधित सगळ्या लोकांचा सन्मान करण्याच्या उद्देशाने हा दिवस साजरा केला जातो. सहाव्या राष्ट्रीय हातमाग दिनानिमित्त वस्त्रोद्योग मंत्रालयाने कोविड-19 महामारी विचारात घेऊन गर्दी टाळण्यासाठी आभासी व्यासपीठाच्या माध्यमातून एक कार्यक्रम आयोजित केला.

हातमाग क्षेत्र हे देशाच्या गौरवशाली सांस्कृतिक वारशाचे प्रतीक आहे आणि देशातल्या उदरनिर्वाहाचा एक महत्त्वपूर्ण स्त्रोत आहे. महिला सक्षमीकरणासाठी हे क्षेत्र महत्त्वाचे आहे कारण 70 टक्क्यांहून अधिक विणकर आणि संबंधित कामगार या महिला आहेत. 1905 साली याच तारखेला सुरू झालेल्या स्वदेशी चळवळीच्या स्मृतिप्रीत्यर्थ 7 ऑगस्टची राष्ट्रीय हातमाग दिन म्हणून निवड झाली.

गिरीश चंद्र मुर्मू यांची कॅगपदी नियुक्ती :

गिरीश चंद्र मुर्मू यांची कॅगपदी (Comptroller and Auditor General of India ) नियुक्ती केली आहे.

केंद्र सरकारनं ३७० कलम रद्द केल्यानंतर जम्मू काश्मीरचं विभाजन करून केंद्र शासित प्रदेश केला. त्यानंतर गिरीश चंद्र मुर्मू यांची राष्ट्रपतींनी जम्मू काश्मीरच्या उपराज्यपालपदी नियुक्ती केली होती.

गुजरात केडरचे आयएएस अधिकारी असलेल्या जी.सी. मुर्मू यांनी २९ ऑक्टोबर २०१९ रोजी उपराज्यपालपदाची सूत्रे हाती घेतली होती. उपराज्यपाल पदीचा कारभार हाती घेण्यापूर्वी मुर्मू वाणिज्य मंत्रालयात सचिव पदावर कार्यरत होते. त्यांच्या जागेवर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी माजी केंद्रीय मंत्री मनोज सिन्हा यांची नियुक्ती केली आहे. मुर्मू यांचा राजीनामा स्वीकारल्यानंतर मुर्मू यांची नियंत्रक व महालेखा परीक्षक (Comptroller and Auditor General of India) पदी नियुक्ती केली आहे. यासंदर्भात आदेशही काढण्यात आला आहे.

Leave a Reply