चालू घडामोडी | 04 ऑगस्ट 2020

स्पेस एक्सची अवकाशकुपी सुखरूप परत :

अमेरिकेतील उद्योगपती इलन मस्क यांच्या स्पेस एक्स कंपनीच्या ड्रॅगन (आता एंडेव्हर) अवकाशकुपीच्या माध्यमातून अवकाशात गेलेले नासाचे दोन अवकाशवीर रविवारी सुरक्षितपणे पृथ्वीवर आले.

या मोहिमेने अवकाश प्रवासाचे खासगीकरण होण्यात महत्त्वाचे पाऊल पडले आहे. पुढील वर्षी खासगी अवकाश पर्यटन सुरू होणार असल्याची चिन्हे आहेत. नासाने त्यांच्या अवकाशवीरांना अवकाश स्थानकात नेण्याआणण्याचे कंत्राट आता स्पेस एक्स कंपनीला दिले आहे.

बोईंग कंपनीला ही संधी देण्यात आली होती पण त्यांना तसे अवकाशवाहन तयार करण्यात तातडीने यश मिळवता आले नाही. ही अवकाशकुपी दोन महिन्यांपूर्वी फ्लोरिडातून सोडण्यात आली होती व ती अवकाशस्थानकाजवळ गेल्यानंतर तेथेच होती. नंतर या अवकाशवीरांचे वास्तव्य पूर्ण झाल्यानंतर त्याच कुपीत बसून ते परत आले.

यापूर्वी नासाचे अवकाशवीर अशाच पद्धतीने २४ जुलै १९७५ रोजी पॅसिफिकमध्ये अवकाशकुपीतून परतले होते. ही अवकाशकुपी वेग कमी करत पृथ्वीच्या वातावरणात येते व नंतर अलगदपणे समुद्रात पाडली जाते. आताच्या मोहिमेत डग हर्ले व बॉब बेन्केन हे स्पेस एक्स ड्रॅगन कॅप्सूलच्या मदतीने परत आले असून शनिवारी ते अवकाशस्थानकातून परतीच्या प्रवासाला निघाले होते.

त्यानंतर त्यांची ही अवकाश कुपी मेक्सिकोच्या आखातातील पेन्साकोला येथे उतरली, वादळग्रस्त फ्लोरिडापासून हे ठिकाण जवळच आहे. एका विशिष्ट उंचीवर आल्यानंतर अवकाशकुपीचे पॅराशूट खुले करण्यात आले त्यामुळे अवतरण सुरक्षित झाले.

मोहालीच्या INST संस्थेत मोतीबिंदूवरील उपचारासाठी शस्त्रक्रिया-विरहित पद्धती विकसित  :

मोहाली (पंजाब) इथल्या इन्स्टिट्यूट ऑफ नॅनो सायन्स अँड टेक्नॉलॉजी (INST) या संस्थेच्या शास्त्रज्ञांनी मोतीबिंदूवरील उपचारासाठी अ‍ॅस्पिरिन औषधापासून नॅनोरोड विकसित केले आहे. अ‍ॅस्पिरिन हे नॉनस्टेरॉइडल एंटी-इंफ्लेमेटरी ड्रग आहे.

मोतीबिंदू विकार

  • मोतीबिंदू म्हणजे डोळ्यातले नैसर्गिक भिंग धुरकट होणे होय. सामान्य डोळ्यात प्रकाशकिरण पारदर्शक भिंगाद्वारे मागील पडद्यावर केंद्रित होतात. उत्तम दृष्टीकरिता नैसर्गिक भिंग पूर्णतः पारदर्शक असणे आवश्‍यक असते.
  • जेव्हा या भिंगाची पारदर्शकता मोतीबिंदू झाल्याने कमी होते तेव्हा रुग्णास अंधूक दिसू लागते. नैसर्गिक भिंग हा बहुतांशी प्रथिने व न्यूक्लिक आम्ल या जैविक रसायनांपासून बनलेला असतो. यात काही कारणांनी बदल झाल्यास नैसर्गिक भिंगाची पारदर्शकता कमी होत जाते.
  • त्यामुळे दृष्टी कमी होते. नैसर्गिक भिंगाच्या कोणत्याही भागास पारदर्शकत्व आले तर त्याला मोतीबिंदू असे म्हणतात.

‘बीसीसीआय’च्या कोव्हिड कृती दलाची स्थापना:

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) कोव्हिड कृती दलाची स्थापना केली असून त्यामध्ये माजी कर्णधार राहुल द्रविडचा समावेश करण्यात आला आहे. द्रविड सध्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचा (एनसीए) प्रमुख आहे.

द्रविडकडे कोव्हिड कृती दलाचा प्रमुख म्हणून जबाबदारी येण्याची शक्यता आहे. ‘एनसीए’चा प्रमुख म्हणून द्रविडसह वैद्यकीय अधिकारी, स्वच्छता अधिकारी यांचा समावेश आहे.

अगरबत्ती उत्पादनामध्ये भारताला आत्मनिर्भर बनविण्यासाठी MSME मंत्रालयाची नव्या योजनेस मान्यता :

भारताला अगरबत्ती उत्पादनामध्ये आत्मनिर्भर बनविण्यासाठी खादी व ग्रामोद्योग आयोगाच्यावतीने (KVIC) प्रस्तावित केलेल्या अनोख्या रोजगार निर्मिती कार्यक्रमास केंद्रिय सूक्ष, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाने मान्यता दिली आहे.

“खादी अगरबत्ती आत्मनिर्भर मोहीम” नावाच्या या कार्यक्रमाचा उद्देश देशातल्या वेगवेगळ्या भागात बेरोजगार आणि स्थलांतरित कामगारांना रोजगार उपलब्ध करून देणे आणि देशांतर्गत अगरबत्ती उत्पादन मोठ्या प्रमाणात वाढविणे हे आहे.

योजनेविषयी

  • KVICने सार्वजनिक-खासगी भागीदारी तत्त्वावर केलेली योजना कमी गुंतवणुकीची आणि कारखानदार व भांडवलाशिवाय असल्यामुळे वैशिष्ट्यपूर्ण आहे.
  • व्यवसायिक भागीदार म्हणून जे यशस्वी खासगी अगरबत्ती उत्पादक करारावर स्वाक्षऱ्या करणार, त्यांच्या माध्यमातून या योजनेच्या अंतर्गत अगरबत्ती बनविणारे स्वयंचलित यंत्र आणि पावडर मिश्रणाचे यंत्र KVIC तर्फे कारागिरांना पुरविण्यात येणार.
  • यंत्राच्या किंमतीवर 25 टक्के अनुदान देण्यात येणार आणि उर्वरित 75 टक्के खर्च दरमहा कारागीरांकडून सुलभ हप्त्यांमध्ये वसूल करण्यात येणार. व्यवसाय भागीदार अगरबत्ती बनविण्यासाठी कारागीरांना कच्चा माल पुरवतील आणि त्यांना रोजगाराच्या आधारावर मजुरी देतील.
  • कारागिरांच्या प्रशिक्षणाची किंमत KVIC आणि खासगी व्यवसायिक भागीदार यांच्यात सामायिक केली जाणार. ज्यात KVIC 75 टक्के खर्चाचा भार उचलणार तर 25 टक्के व्यवसाय भागीदार देय असणार. केंद्रीय मंत्री गडकरी यांच्या पुढाकाराने वाणिज्य व अर्थ मंत्रालयाने कच्च्या अगरबत्तीवरील आयात निर्बंध आणि बांबूच्या लाठीवरील आयात शुल्कात वाढ या प्रमुख दोन निर्णयांच्या पार्श्वभूमीवर ही योजना आखण्यात आली आहे.
  • हा पथदर्शी प्रकल्प लवकरच सुरू करण्यात येणार असून आणि पूर्ण क्षमतेने प्रकल्पाची अंमलबजावणी झाल्यानंतर, अगरबत्ती उद्योगात हजारो रोजगार निर्माण होतील. देशात सध्या अगरबत्तीचा वापर दररोज अंदाजे 1490 मेट्रिक टन आहे, तथापि भारताचे दररोज अगरबत्तीचे उत्पादन फक्त 760 मेट्रिक टन आहे.

1 thought on “चालू घडामोडी | 04 ऑगस्ट 2020”

Leave a Reply