चालू घडामोडी | 11 जानेवारी 2021

गगनयान मोहिमेतील दोन शल्यचिकित्सक प्रशिक्षणासाठी लवकरच रशियाला :

भारताच्या गगनयान या मानवी अवकाश मोहिमेत दोन शल्यचिकित्सकांनाही प्रशिक्षण देण्यात येणार असून ते लवकरच त्यासाठी रशियाला रवाना होणार आहेत. भारतीय अवकाश संशोधन संस्था म्हणजे इस्रोने या मोहिमेची तयारी सुरू ठेवली असून दोन फ्लाइट सर्जन म्हणजे शल्यचिकित्सक डॉक्टर्स हे त्यात सहभागी होणार आहेत.

भारतीय हवाई दलातून या दोन डॉक्टरांची निवड करण्यात आली असून ते अवकाश वैद्यक शाखेतले जाणकार आहेत. भारतीय हवाई दलातील चार वैमानिकांची निवड इस्रोने मानवी अवकाश मोहिमेसाठी केली असून त्यांचे प्रशिक्षण युरी गागारिन संशोधन व चाचणी अवकाशवीर प्रशिक्षण केंद्र या मॉस्कोतील ठिकाणी गेल्या वर्षीपासून सुरू आहे.

युरी गागारिन हे अवकाशाची सफर करणारे जगातले पहिले अवकाशवीर होते. मध्यंतरीच्या काळात करोनामुळे रशियात टाळेबंदी लागू केल्याने भारतीय अवकाशवीरांचे प्रशिक्षण रखडले होते. भारताचे हवाई शल्यचिकित्सक हे फ्रान्सलाही प्रशिक्षणासाठी जाणार आहेत पण तेथील प्रशिक्षण सैद्धांतिक पातळीवरचे असेल.

फ्रान्स हा देश अवकाश वैद्यकात आघाडीवर असून मेडीस स्पेस क्लिनिक ही सीएनईएसची स्वतंत्र वैद्यक संस्था आहे. गगनयान ही भारताची मानवी अवकाश मोहीम २०२२ मध्ये तीन भारतीयांना अवकाशात घेऊन जाणार असून करोनामुळे ती रेंगाळली आहे.

श्रीनिवास पोकळेला “आनंदी बालकलाकार पुरस्कार’ :

बालकलाकार श्रीनिवास पोकळे याला पहिला “आनंदी बालकलाकार पुरस्कार-२०२१’ प्रदान करण्यात आला.

“नाळ’ या चित्रपटामध्ये “चैत्या’ची भूमिका करून ‘आई मले खेळाले जाऊ दे न व’ या गाण्याने मराठी प्रेक्षकांच्या हृदयामध्ये जिव्हाळ्याचे स्थान निर्माण केलेला बालकलाकार श्रीनिवास पोकळे याला “आनंदी गुरुकुल अॅक्टिंग अॅकॅडमी, अकोला’ या संस्थेच्या वतीने पहिला आनंदी बालकलाकार पुरस्कार-२०२१ प्रदान करण्यात आला.

संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या तीन समित्यांचे अध्यक्षपद भारताला :

भारताला संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या तीन प्रमुख समित्यांचे अध्यक्षपद मिळाले आहे.

2022 साठीची दहशतवादविरोधी समिती, तालिबान निर्बंध समिती आणि लीबिया निर्बंध समितीचे अध्यक्षपद भारताला मिळाल्याचे संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेतले भारताचे कायमस्वरूपी प्रतिनिधी टी. एस. त्रिमूर्ती यांनी सांगितले.

दहशतवादविरोधी समितीचे अध्यक्षपद मिळणे भारतासाठी विशेष उल्लेखनीय असल्याचे त्रिमूर्ती यांनी नमूद केले.

भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी जम्मू व काश्मिर सरकारचे ‘सतर्क नागरिक’ अ‍ॅप :

जम्मू व काश्मिर केंद्रशासित प्रदेशाचे उपराज्यपाल मनोज सिन्हा यांच्या हस्ते ‘सतर्क नागरिक’ नामक एका मोबाईल अ‍ॅपचे अनावरण करण्यात आले.

भ्रष्टाचाराला आळा घालणे हे या अॅपचे उद्दीष्ट असून त्याच्या माध्यमातून नागरिकांच्या तक्रारी नोंदविण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

राज्य सरकारचे दक्षता अधिकारी विभाग या अॅपचे व्यवस्थापन बघणार आहे.

Leave a Comment